
फ्रान्सने भारतामध्ये येणारं तेलाचं एक जहाज पकडलं आहे, त्यानंतर रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन चांगलेच संतापले आहेत, फ्रान्सने रशियाशी संबंधीत असलेलं हे कच्च्या तेलाचं जहान पकडल्यानंतर पुतिन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे, हा समुद्रातील दरोडा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जर हे सर्व असंच चालू राहिलं तर याचे परिणाम गंभीर होऊ शकतात, असा इशाराही पुतिन यांनी फ्रान्सला दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, जर रशियानं आपल्या कच्च्या तेलाचा पुरवठा केला नाही तर जागतिक तेल बाजारात खळबळ उडेल, तेलाचे बाजारभाव प्रचंड वाढतील, अनेक देशांच्या अर्थव्यवस्था ठप्प होतील, तेलाशिवाय जगाची अर्थव्यवस्था फार काळ तग धरू शकणार नाही, जगभरात हाहाकार उडेल, असंही यावेळी पुतिन यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे भारतामध्ये कच्चे तेल घेऊन जे जहाज येणार होतं, त्या जहाच्या पायलटवर आम्ही खटला चालवणार असल्याचं फ्रान्सने म्हटलं आहे.
दरम्यान जहाज हे न्यूट्रल पाण्यात पकडलं गेलं आहे, त्यावर कोणतीही सैन्य सामग्री किंवा ड्रोन नव्हते, ही फ्रान्सची राजकीय कुरघोडी आहे. त्यांच्या देशांतर्गत सुरू असलेल्या समस्यांवरून जगाचं लक्ष दुसरीकडे हटवण्यासाठी फ्रान्सकडून हे सर्व सुरू आहे, असा दावाही यावेळी रशियानं केला आहे. द गार्डियनच्या रिपोर्टनुसार या जहाजाचं नाव बोराके असं आहे, हे जहाज वीस सप्टेंबर रोजी रशियाच्या प्रिमोर्स्क तेल टर्मिनल्सवरून भारतामध्ये येण्यास रवाना झालं होतं. त्यानंतर हे जहाज फ्रान्सच्या नौदलानं पकडलं. या जहाजावर कोणत्याही देशाचा झेंडा नव्हता, तसेच जहाजाच्या कॅप्टनने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये देखील गडबड आहे, असा दावा आता फ्रान्सच्या वतीनं करण्यात आला आहे.
कॅप्टनवर खटला चालवणार
दरम्यान फ्रान्सच्या हद्दीला लागून असलेल्या अटलांटिक समुद्र किनाऱ्याच्या क्षेत्रामध्ये हे जहाज पकडण्यात आलं आहे, या जहाजाच्या कॅप्टनवर खटला चालवण्याचा निर्णय फ्रान्सने घेतला आहे, सर्व कायदेशीर प्रतिक्रिया पूर्ण होऊन फेब्रुवारी महिन्यात कॅप्टनवर खटला चालवण्यात येईल असं फ्रान्सने म्हटलं आहे. मात्र यावर प्रतिक्रिया देताना रशियानं चांगलीच संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.