Rajdhani Express Accident : भीषण अपघात, राजधानी एक्सप्रेसची हत्तीच्या कळपाला धडक, 8 हत्तींचा जागीच मृत्यू

Rajdhani Express Accident : राजधानी एक्सप्रेसला भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर या मार्गावरील अनेक ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. काही ट्रेन्सचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्याशिवाय रेल्वे प्रशासनाकडून प्रवासी आणि त्यांच्या नातलगांना माहिती देण्यासाठी हेल्पलाइन नंबर सुरु करण्यात आला आहे.

Rajdhani Express Accident : भीषण अपघात, राजधानी एक्सप्रेसची हत्तीच्या कळपाला धडक, 8 हत्तींचा जागीच मृत्यू
Train
Image Credit source: Representative Image
| Updated on: Dec 20, 2025 | 9:27 AM

आसाममध्ये एका भीषण रेल्वे अपघात झाला आहे. जमुनामुखच्या सानरोजा भागात सैरांगवरुन नवी दिल्लीला जाणारी राजधानी एक्सप्रेस हत्तीच्या एका कळपाला धडकली. शुक्रवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. हत्तींचा कळप रेल्वे रुळ ओलांडत असताना वेगात येणारी राजधानी एक्सप्रेस धडकली. या भीषण अपघातात ट्रेनच्या इंजिनसह पाच डब्बे रुळावरुन घसरले. या दुर्घटनेत 8 हत्तींचा जागीच दुर्देवी मृ्त्यू झाला. काही हत्ती जखमी झाल्याची सुद्धा शक्यता आहे.

अपघातानंतर या मार्गावरील अनेक ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. काही ट्रेन्सचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्याशिवाय रेल्वे प्रशासनाकडून प्रवासी आणि त्यांच्या नातलगांना माहिती देण्यासाठी हेल्पलाइन नंबर सुरु करण्यात आला आहे. सोबत मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हत्तींचा कळप लोको पायलटच्या दृष्टीस पडताच त्याने इमर्जन्सी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. पण, तरीही ट्रेन हत्तीच्या कळपांना धडकली.

हत्तीच्या शरीराचे तुकडे-तुकडे

ट्रेनची धडक इतकी जोरदार होती की, हत्तीच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले. त्यांच्या शरीराचे भाग रेल्वे ट्रॅकवर विखरुन पडलेले होते. त्यामुळेच अनेक ट्रेन्सचे मार्ग वळवण्यात आले. अनेक ट्रेन्स रद्द करण्यात आल्या. धडकेनंतर ट्रेनला जोरदार झटका बसला. त्यामुळे आतमधील प्रवासी देखील घाबरले. अनेक प्रवासी आपल्या आसनावरुन खाली पडले. दिलासा देणारी एकच बाब म्हणजे अजूनपर्यंत कुठला प्रवासी गंभीररित्या जखमी झालेला नाही.

ट्रेन गुवाहाटीसाठी रवाना

या दुर्घटनेत जे डब्बे रुळावरुन घसरले. त्यातील प्रवाशांना अन्य डब्ब्यातील रिकाम्या बर्थवर शिफ्ट करण्यात आलं आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. प्रभावित डब्बे वेगळे केल्यानंतर ट्रेनला गुवाहाटीसाठी रवाना करण्यात आलं. गुवाहाटीला पोहोचल्यानंतर प्रवाशांच्या सुविधेसाठी आणखी डब्बे ट्रेनला जोडण्यात येतील. त्यानंतर ट्रेन पुढच्या प्रवासाला सुरुवात करेल.