सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Sanitation worker Fortuner : सफाई कर्मचाऱ्याचा पगार तो किती असणार? अथवा त्याची रोजंदारी ती किती असणार? याचा तुम्ही हिशोब लावत असाल तर ही बातमी धक्का देईल. कारण हा कर्मचारी फॉर्च्युनरनं येत झाडू काम करतो. त्याचं काम तो चोख बजावतो. नगरपालिकेच्या सीईओला सुद्धा त्याचा हा कडक स्वॅग आवडतो

सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 24, 2026 | 9:08 PM

कर्नाटक जिल्ह्यातील बंटवाल नगरपालिकेतील एक सफाई कर्मचारी सेसप्पा हे गेल्या काही दिवसांपासून एकदम चर्चेत आले आहे. सेसप्पा रोज सकाळी त्यांच्या टोयोटा फॉर्च्युनर या कारने कामावर येतात. ज्या परिसरात त्यांची झाडू मारण्याची ड्युटी असते. त्या भागात ते चारचाकीने येतात. यापूर्वी सुद्धा ते त्यांच्या खासगी वाहनानं स्वच्छता कामावर हजर होतं. त्यांच्याकडे अगोदर मारूती 800, ऑल्टो आणि स्कॉर्पियो सारख्या चारचाकी होत्या. त्यांनी प्रत्येक वाहन विकून दुसरे वाहन खरेदी केले आहे. सध्या त्यांच्याकडे फॉर्च्युनर आहे. त्यांना फॉर्च्युनरमधून उतरून झाडू काम करताना पाहिल्यावर लोक तोंडात बोटं घालतात. तर नगरपालिका सीईओला, मुख्याधिकाराला सुद्धा त्यांचा हा कडक स्वॅग आवडतो.

50 रुपये रोजंदारीपासून सुरुवात

45 वर्षीय सेसप्पा 1996 मध्ये 50 रुपये रोजंदारीवर बंटवाल नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कामावर रुजू झाले. त्यानंतर सेसप्पा यांना नोकरीत कायमस्वरूपी सामावून घेण्यात आले. आपल्याकडे कार असावी हे त्यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली. सफाई कर्मचारी म्हणून काम करतानाच त्यांनी इतरही अनेक कामं केली. ही ड्युटी सुटल्यानंतर इतर ठिकाणी कामं केली. शेतीत राबले. दूध डेअरीत काम केले.

सेसप्पा आणि मुलाला वाहनांची आवड

सेसप्पा आणि त्यांच्या मुलाला वाहनांची आवड आहे. चारचाकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते दोघेही मेहनत घेतात. त्यासाठी त्यांनी अनेकदा कर्ज घेतले. ते वेळेआधी फेडले. मारूती 800, ऑल्टो आणि स्कॉर्पियो सारख्या चारचाकी त्यांनी कष्टायच्या जोरावर खरेदी केल्या. त्यानंतर त्यांनी एक सेकंडहँड फॉर्च्युनर खरेदी केली. सुरुवातीचा काळ अत्यंत संघर्षात गेला. घरी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. त्यांना मध्यंतरी दारूचे व्यसन लागले होते. पण ते या सर्व काळातून सावरले आणि अनुभवातून शिकले.

वडीलांच्या अंत्यसंस्कारासाठी नव्हते पैसे

सुरुवातीचा संघर्षमय काळ आठवताना वडीलांच्या अंत्यसंस्कारावेळी खिशात पैसे नव्हते हे सांगताना त्यांना भरून येते. मदत न मिळाल्याने कुटुंबियांनी वडीलांवर नेत्रवती नदीच्या किनाऱ्यावर तिथच लाकूडफाटा जमा करत अंत्यसंस्कार केल्याचे त्यांनी सांगितले. बंटवाल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बेलियप्पा यांच्यामुळे आयुष्य बदलले. त्यांच्यामुळे दारू सुटली, अशी माहिती त्यांनी दिली.

Follow Us