आमच्याकडे निर्लज्ज येत नाहीत, निर्लज्जांना आम्ही शिवसेनेत घेत नाही; राऊतांचा दलबदलूंना टोला

| Updated on: Oct 01, 2021 | 1:13 PM

गोव्यातील दलबदलूंना शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार फटकारले आहे. गोव्यात आम्ही स्वबळावर लढणार आहोत. युती आणि आघाडीचं राजकारण करणार नाही, असं सांगतानाच आमच्याकडे निर्लज्ज येत नाहीत. (sanjay raut)

आमच्याकडे निर्लज्ज येत नाहीत, निर्लज्जांना आम्ही शिवसेनेत घेत नाही; राऊतांचा दलबदलूंना टोला
sanjay raut
Follow us on

पणजी: गोव्यातील दलबदलूंना शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार फटकारले आहे. गोव्यात आम्ही स्वबळावर लढणार आहोत. युती आणि आघाडीचं राजकारण करणार नाही, असं सांगतानाच आमच्याकडे निर्लज्ज येत नाहीत. आम्ही निर्लज्जांना शक्यतो शिवसेनेत घेत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी खासदार राहुल शेवाळेही उपस्थित होते. आमच्याकडे निर्लज्ज येत नाही. निर्लज्जांना शक्यतो आम्ही घेत नाही. निर्लज्ज राजकारणी म्हणालो. एका पक्षातून निवडून यायचं आणि दुसऱ्या पक्षात जायचं हे सध्या गोव्यात सुरू आहे. त्यामुळे मी हे म्हणत आहे. गोव्याला एक परंपरा आहे. गोव्यात अनेक चांगले राजकारणी झाले. पण अलिकडे गोव्याचं राजकारण निर्लज्जतेच्या पातळीवर गेलं आहे, असं राऊत म्हणाले.

हे किती काळ चालणार?

आज एका तिकिटावर निवडून यायचं आणि लगेच निर्लज्जपणे दुसऱ्या पक्षात सत्तेसाठी उडी मारायची. हे कुठे तरी गोव्याच्या जनतेलाच थांबवावं लागेल. हे कशा पद्धतीने थांबवायचं याची योजना शिवसेनेकडे आहे. गोव्यात वारंवार पक्षांतर करणं किती काळ चालणार?, असा सवाल त्यांनी केला.

22 ते 25 जागां लढू

गोव्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीचे वारे वाहू लागले म्हणून आम्ही आलो नाही. नेहमी येतो. कमिटमेंट म्हणून आलोय. आम्ही आघाडी आणि युती टाळण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना म्हणून 22 ते 25 जागा लढणार आहोत. मजबूत सरकार हवं असेल तर गोव्याची जनता शिवसेनेला मतदान करेल. शिवसेनेचे आमदार गोव्याच्या विधानसभेत निवडून पाठवतील. गोव्यात चांगलं सुशासन द्यावं ही आमची भूमिका आहे, असं त्यांनी सांगितलं.

गोव्याला काय मिळणार?

मागच्या वेळी आघाडीत निवडणूक लढवली होती. आमच्या वाट्याला तीन जागा आल्या होत्या. ज्या जागा वाट्याला आल्या त्याचा शिवसेनेशी काहीच संबंध नव्हता. तरीही आम्ही लढलो. त्यानंतर सुद्धा गोव्यात सेनेचं काम सातत्याने सुरू राहिलं. नेहमीप्रमाणे गोव्यात इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारण्याचे राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहेत. या उड्या दिल्लीपर्यंत जातात. यावेळी या उड्यांची मजल पश्चिम बंगालपर्यंत गेली. अगदी कोलकात्यापर्यंत गेली. चांगलं आहे. अखंड देश आहे. कोणी कुठेही उडी मारू शकतो. त्यातून गोव्याला काय मिळणार? प्रत्येक वेळेला निवडणूक आली की नवीन नवीन पर्याय उभे राहतात. तसे नवीन पर्याय आता उभे केले जात आहेत. आनंद आहे. मात्र, शेवटी गोवेकरांच्या मनात असेल तेच होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गोव्याच्या जनतेचं भाग्य उजळेल का?

मागच्या वेळी काँग्रेसला बहुमताजवळ होती. पण त्यांचे लोक फुटले आणि भाजपचं सरकार बनलं. भाजपचं सरकार त्याच पद्धतीने. त्यांना फक्त 12 आमदार दिले. पण त्यांनी तोडफोड करून सरकार बनवलं. आज पुन्हा एकदा काँग्रेस फुटला आहे. तृणमूलचा आज उदय झाला आहे. आपही आहे. कोणीही येऊ द्या. पण त्यामुळे गोव्यातील जनतेचं भाग्य उजळेल का? हा जनतेच्या मनात प्रश्न आहे, असा सवालही त्यांनी केला.

गोव्याला नेतृत्वच नाही

प्रमोद सावंत हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. पण त्यांचा प्रभाव राज्यात नाही. मनोहर पर्रिकर यांच्या निधानानंतर गोव्याला नेतृत्वच राहिलं नाही. पर्रिकरांनंतर गोव्याची स्थिती तितकीशी बरी नाही, असं त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षात बसणं हा अपमान नाही. आम्हाला गोव्यात विरोधी पक्षात बसावं लागलं तरी चालेल, पण आम्ही लढणारच, असंही त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे गोव्यात प्रचाराला येणार, डिपॉझिट जप्त का व्हायचं?; राऊतांनी सांगितलं कारण

भाजपातही जाणार नाही, कॅप्टन नवीन टीम तयार करणार?; पंजाब निवडणुकीत अमरिंदर सिंगांचा ‘खेला होबे’?

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, आकडा 26 हजारांच्या पार

(sanjay raut addresses media in goa amide goa assembly polls)