सत्तेसाठी 2014मध्ये शिवसेनेला दूर ठेवण्याचा डाव होता, राऊतांचा गंभीर आरोप; संदर्भ नेमका काय? वाचा सविस्तर

| Updated on: Dec 20, 2021 | 1:03 PM

सत्तेसाठी 2014मध्ये शिवसेनेला दूर ठेवण्याचा भाजपचा डाव होता. आम्ही सत्तेसाठी हपापलो नव्हतो तर तुम्हीच आमच्याविरोधात कट कारस्थान रचत होता, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.

सत्तेसाठी 2014मध्ये शिवसेनेला दूर ठेवण्याचा डाव होता, राऊतांचा गंभीर आरोप; संदर्भ नेमका काय? वाचा सविस्तर
Sanjay Raut
Follow us on

नवी दिल्ली: सत्तेसाठी 2014मध्ये शिवसेनेला दूर ठेवण्याचा भाजपचा डाव होता. आम्ही सत्तेसाठी हपापलो नव्हतो तर तुम्हीच आमच्याविरोधात कट कारस्थान रचत होता, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. राऊत यांनी हा आरोप हवेत केलेला नाही. तर 2014 मध्ये भाजपच्याच एका नेत्याने शिवसेनेला भाजपच्या कटाची माहिती दिली होती. त्यामुळेच संजय राऊत यांनी थेट भाजपवर हा आरोप करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आव्हानच दिलं आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

अमित शहा नेमके काय म्हणाले होते?

अमित शहा काल पुण्यात होते. यावेळी त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. हा संवाद साधत असतानाच शिवसेनेवरही हल्ला चढवला. 2019मध्ये महाराष्ट्रात निवडणुका होत्या. त्यावेळी मी स्वत: इथे आलो होतो. मी स्वत: शिवसेनेशी संवाद साधला. तेव्हा फडणवीसांच्या नेतृत्वातच निवडणुका लढायचं ठरलं होतं. मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार हे सुद्धा ठरलं होतं. पण शिवसेना फिरली. त्यांनी हिंदुत्वाशीही तडजोड केली. दोन पिढ्यांपासून ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच मांडीवर जाऊन बसेल आणि म्हणतात आम्ही असं म्हणालोच नाही, असा हल्ला शहा यांनी चढवला होता.

राऊतांचा पलटवार काय?

शहा यांनी 2019च्या निवडणुकीवरून शिवसेनेवर हल्लाबोल केल्यानंतर राऊत यांनी त्यांना 2014च्या निवडणुकीच्या वेळच्या परिस्थितीची आठवण करून दिली. अमित शहांचं वक्तव्य पूर्णपणे असत्याला धरून आहे. कालच्या भाषणात ते खरं काय बोलले हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत होतो. आमचं सरकार, आमची भूमिका, आमच्या हिंदुत्वाविषयी प्रश्न उपस्थित करून देशातील जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तरीही जनता विश्वास ठेवायला तयार नाही हे राज्यातील जनतेकडे पाहतोय. पण आता त्यांचे सर्वोच्च नेते, केंद्रीय नेते त्याच वैफल्यातून बोलत आहेत. हे मी पाहिलं तेव्हा आम्हा सर्वांना त्यांची दया आली आणि आश्चर्य वाटलं. आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा सोडला नाही सोडणार नाही. 2014 साली सत्तेसाठी, सत्तेचा वाटा जास्त मिळावा यासाठी 2014 साली शिवसेनेला दूर करा असं राज्यातील भाजपच्या नेत्यांना खासगीत सांगणारे कोण होते? अमित शहा यांनी ते स्पष्ट करावं, असं आव्हानच त्यांनी दिलं.

मी 2014ची गोष्ट सांगतो. हिंदुत्वाला सोडलं म्हणता ना… ते असं म्हणतात वेगळं लढून दाखवा… 2014मध्ये आम्ही वेगळे लढलो होतो. प्रचंड ताकद, पैसा केंद्रीय सत्ता याची कृत्रिम लाट असताना आम्ही प्रचंड ताकदीनं लढलो. 2014पासून महाराष्ट्रात पावलोपावली विश्वासघात करणारे कोण याचं उत्तर द्यावं. आम्ही प्रखर हिंदुत्वावादी होतो. 25 वर्ष तुमच्यासोबत युती केली आहे. 2014ला शिवसेनेला दूर ठेवा, हिंदुत्ववादी पक्षाला दूर ठेवा आणि फक्त महाराष्ट्राची सत्ता काबीज करता यावी म्हणून कोणी कट कारस्थानं केली याचं उत्तर द्यावं, पुण्यात जमत नसेल तर दिल्लीत उत्तर द्यावं, असं राऊत म्हणाले.

राऊतांचा थेट आरोप का?

संजय राऊत यांनी 2014मधील राजकीय घडामोडींवरून भाजपवर निशाणा साधला आहे. यापूर्वीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. भाजपला शिवसेना संपवायची आहे असं भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीच आपल्याला सांगितलं होतं, असं उद्धव ठाकरे यांनी या भाषणात म्हटलं होतं. त्याचाच संदर्भ देत राऊत यांनी आज भाजपला घेरलं आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून काही दिवस राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: हे ट ला ट, फ ला फ, झ ला झ आम्हालाही लावता येतं, मोदींच्या प्रश्नावर राऊत का भडकले?

VIDEO: फडणवीसांनी तपास यंत्रणेचे ओएसडी बनावं अन् सोमय्यांना प्रवक्ता नेमावं; मलिकांचा हल्लाबोल सुरूच

VIDEO: आमदार, मंत्री झाला तरी पालिकेत जीव कसा घुटमळतोय, आता जीव मोकळा करा; महापौर किशोरी पेडणेकरांचा शेलारांवर हल्लाबोल