दिल्लीत राजकीय हालचालींना वेग, शरद पवारांकडून विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी
'सामना'तून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) नेतृत्व देण्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्यानंतर दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आलाय.

नवी दिल्ली : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) अध्यक्ष शरद पवार यांना संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) नेतृत्व देण्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्यानंतर दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आलाय. शरद पवार आज (28 डिसेंबर) विविध पक्षांच्या नेत्यांना भेटणार आहेत. असं असलं तरी या भेटींमागील कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र, सध्या तरी या भेटीगाठींचा संबंध यूपीए अध्यक्षपदासाठीची मोर्चेबांधणी असाच लावला जातोय (Sharad Pawar will meet various party leaders in Delhi ).
शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’त राहुल गांधी यांच्यावरही भाष्य केलं होतं. सामनात म्हटलं होतं, “राहुल गांधी काम करत आहेत, मात्र अजूनही त्यांच्या नेतृत्वात कमतरता आहेत. काँग्रेसला एक पूर्णवेळ अध्यक्षाची गरज आहे. याशिवाय सुंयक्त पुरोगामी आघाडीतही (यूपीए) गडबड आहे. विरोधी पक्षांना एकजूट करण्यासाठी नेतृत्वाची गरज आहे. अशात यूपीएमध्ये केवळ शरद पवार यांचंच नेतृत्व दिसतंय. त्यांच्या अनुभवाचा उपयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वजण घेतात.”
दरम्यान, शरद पवार दिल्लीत दाखल झाल्यानंतर पवार यूपीएच्या अध्यक्षपदाची मोर्चेबांधणी करणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरलाय. त्यामुळे पवारांच्या या दिल्लीवारीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
शेतकरी आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. या महिन्याभरात शेतकरी नेते आणि केंद्र सरकारच्या अनेक बैठकाही झाल्या. मात्र, त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. विरोधी पक्षनेत्यांनी राष्ट्रपतींना भेटून निवेदनं दिल्यानंतरही शेतकरी आंदोलन सुरूच आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच कृषी कायद्याचं समर्थन करत विरोधकांनी भ्रमित केल्यामुळेच शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा तिढा सुटण्याची शक्यता धुसर झाली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना एकत्र करण्यासाठी पवार दिल्लीत दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे.
विरोधकांना एकत्र करून हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्व विरोधकांना एकत्र करून सरकारवर हल्लाबोल करण्याच्या तयारीत पवार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी पवारांनी सर्व विरोधी पक्षांची उद्या दिल्लीत बैठक बोलावल्याचंही सूत्रांनी सांगितलं. या बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि बसपा सुप्रिमो मायावती उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पवारांचा काँग्रेसला शह?
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असली तरी या माध्यमातून विरोधकांना आपल्या नेतृत्वाखाली एकत्र आणण्याचा पवारांचा प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मधल्या काळात यूपीएच्या चेअरमनपदासाठी पवारांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यामुळे विरोधकांना एकत्र करून शेतकरी प्रश्नावर सरकारला कायदा मागे घेण्यास भाग पाडल्यास पवारांचं विरोधी पक्षातील वजन आपोआपच वाढेल आणि यूपीएचे अध्यक्षपद त्यांच्याकडे देण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे पवारांनी विरोधकांची उद्या बोलावलेली बैठक ही काँग्रेसला एकप्रकारे शहच असल्याचंही बोललं जात आहे.
संबंधित बातम्या:
शरद पवार आधी यूपीएचे चेअरमन होणार, नंतर पंतप्रधान? कोण काय म्हणतंय?
शरद पवारांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावे, काँग्रेसची गळ
पवारांनी जो चमत्कार महाराष्ट्रात केला, तो देश पातळीवर करतील?; समजून घ्या 12 पॉईंटमधून!
Sharad Pawar will meet various party leaders in Delhi
