The Kashmir Files मुळे देशातील बंधुप्रेम संपवलं जातंय, शरद पवारांचं वक्तव्य; पंतप्रधान मोदींवर निशाणा

| Updated on: Mar 29, 2022 | 7:41 PM

'द काश्मिर फाईल्स'च्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधलाय.

The Kashmir Files मुळे देशातील बंधुप्रेम संपवलं जातंय, शरद पवारांचं वक्तव्य; पंतप्रधान मोदींवर निशाणा
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘द काश्मिर फाईल्स’च्या (The Kashmir Files) मुद्द्यावरुन पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. ‘या चित्रपटामुळे एक विचार मारला जातोय. त्यात गांधीजी, नेहरू यांचा काय संबंध? यातून देशातलं बंधुप्रेम संपवलं जात आहे’, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केलीय. पवारांनी यापूर्वीही या चित्रपटाच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. राजधानी दिल्लीत आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात यूपीए अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरुन महत्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं केली आहे.

शरद पवार म्हणाले की, दु:ख याचं आहे की पंतप्रधान कुठल्याही पक्षाचे असोत त्यांना देश एक ठेवणं महत्वाचं असतं. मात्र पंतप्रधान म्हणतात चित्रपट चांगला आहे. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन सुरु होतं. तेव्हा एका दुपारी एकही आमदार सदनात नव्हता. ते सगळे चित्रपट पाहायला गेले होते. असंच सुरु राहिलं तर देशात एकता राहणार नाही. इतकंच नाही तर, देशातील धर्मनिरपेक्षतेवर भाजपचा विश्वास नाही. त्यात काही पाठिंबा भाजपला मिळाला आणि सत्ता त्यांच्याकडे आली. एक चित्रपट येतो, त्यात काश्मिरी पंडितांवर हल्ले झाले आणि ते हल्ले काँग्रेस आणि अल्पसंख्यांकांनी केले हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. हिंदुंवर अत्याचार झाले हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, असंही पवारांनी म्हटलंय.

‘समाजात एकता कशी राहिल हे पाहिलं पाहिजे’

काश्मिरी पंडितांच्या विस्थापनावेळी व्ही. पी. सिंग सत्तेत होते. त्यांना भाजपचा पाठिंबा होता. मुफ्ती मोहम्मद गृहमंत्री, राज्यपाल कोण हे सगळ्यांना माहिती आहे. आता त्याचा मुद्दा तयार केला जातो. त्याची जबाबदारी तेच घेऊ शकतात. जे काही झालं ते देशासाठी चांगलं झालं नाही. त्या लोकांना इकडे यावं लागलं ही चांगली गोष्ट नव्हती. पण जे झालं ते विसरून समाजात एकता कशी राहिल हे पाहिलं पाहिजे.

ममता बॅनर्जींचं शरद पवारांना पत्र

केंद्रीय तपास यंत्रणांच्या मुद्द्यावरुनही पवारांनी यावेळी भाष्य केलं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्र पाठवलं आहे. त्यांनी सल्ला दिला आहे की, भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय. चर्चा करुन त्यावर धोरण ठरवू. त्यासाठी एकत्र भेटू. तुम्ही पुढाकार घ्या. आम्ही संसदेत बोलू आणि त्यानंतर काय करायचं ते ठरवू, असंही पवारांनी सांगितलं.

इतर बातम्या : 

येऊ का ‘झाडू’ मारायला?, दिल्ली, पंजाब जिंकल्यानंतर ‘आप’चा मुंबई महापालिकेवर डोळा; सर्व जागा लढण्याची घोषणा

‘तुकड्यावर जगणारांनी शहाणपणा शिकवू नये’, सदाभाऊंचा मिटकरींवर पलटवार; पवारांवरील टीकेवरुन दोघांत जुंपली