जास्तीत जास्त मुलं जन्माला घालणाऱ्यांना मिळणार बक्षीस, भारतातील ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

भारतातील एका राज्यातील मुख्यमंत्र्यांनी स्थानिक लोकांना लोकसंख्या वाढीसाठी प्रोत्साहन देण्याची घोषणा केली. जास्तीत जास्त मुलं जन्माला घालणाऱ्या जोडप्यांना विविधं बक्षीसे देण्याचे सिक्कीम सरकारने जाहीर केले आहे.

जास्तीत जास्त मुलं जन्माला घालणाऱ्यांना मिळणार बक्षीस, भारतातील या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 17, 2023 | 10:49 AM

गंगटोक – जी जोडपी जास्तीत जास्त मुलांना जन्म देतील त्यांना विविध बक्षीसं (rewards for more child birth) देण्याचे सिक्कीम सरकारने (Sikkim government)  ठरवले आहे. मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग (chief minister prem singh tamang)  यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. जास्तीत जास्त मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. रविवारी जोरेथांग येथे संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या समारंभात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. सिक्कीममधील स्थानिक जाती, जमातींमध्ये मुलं जन्माला घालण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात कमी झाल्याने स्थानिक समुदायाची लोकसंख्या घटल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. असा निर्णय घेणारे सिक्कीम हे पहिलेच राज्य आहे.

आपल्याला महिलांसह स्थानिक लोकांना अधिक मुलं होण्यासाठी प्रोत्साहित करून घटता प्रजनन दर रोखण्याची गरज आहे, असे तमांग म्हणाले.

महिलांना 365 दिवसांची मातृत्व रजा

सिक्कीममधील जन्मदर वाढावा, मुलांना जन्म देण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी सरकारी नोकरीतील महिलांना 365 दिवस म्हणजेच 1 वर्षाची मातृत्व रजा तर पुरूष कर्मचाऱ्यांना 30 पितृ्तव रजा दिली जाते, असे मुख्यमंत्री तमांग यांनी सांगितले. याव्यतिरिक्त महिला कर्मचाऱ्यांना दुसरे अपत्य झाल्यास जन्मासाठी एक वेतन वाढ आणि तिसरे अपत्य झाल्यास दुप्पट पगारवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने दिला आहे, असेही ते म्हणाले.

या महिलांना आर्थिक लाभ मिळणार नाही

हा आर्थिक लाभ केवळ एक मूल/ अपत्य असणाऱ्या महिलेला मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जे लोकं एकापेक्षा अधिक मुलं जन्माला घालतील त्यांना आर्थिक लाभ मिळेल. या सदंर्भातील तपशील आरोग्य व महिला, बाल संगोपन विभागांद्वारे तयाक करण्यात येईल, असे तमांग यांनी नमूद केले.

रुग्णालयांत आयव्हीएफ सुविधा

मुख्यमंत्री तमांग यांनी सांगितले की सरकारने सिक्कीममधील रुग्णालयांमध्ये आयव्हीएफ (कृत्रिम गर्भधारणेसाठी तंत्रज्ञान) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या महिलांना नैसर्गिकरित्या गर्भधारणेत अडचण येते, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयव्हीएफ प्रक्रियेद्वारे मुलांना जन्म देणाऱ्या सर्व महिलांना 3 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल. सरकारी रुग्णालयात आयव्हीएफ सुविधेचा वापर करून आत्तापर्यंत 38 महिला गर्भवती झाल्याचे मुख्यमंत्री तमांग यांनी सांगितले.

सिक्कीमची सध्याची लोकसंख्या सात लाखाहून कमी आहे.