JNU राडा : योगेंद्र यादवांनाही मारहाण, राडेबाजीचं व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल

जवाहर लाल नेहरु विद्यापीठात (Jawaharlal Nehru University) चेहरा झाकलेल्या जवळपास 50 गुडांच्या टोळक्याने विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला (Yogendra Yadav assaulted thrice in JNU).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:06 AM, 6 Jan 2020
JNU राडा : योगेंद्र यादवांनाही मारहाण, राडेबाजीचं व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल

नवी दिल्ली: जवाहर लाल नेहरु विद्यापीठात (Jawaharlal Nehru University) चेहरा झाकलेल्या जवळपास 50 गुडांच्या टोळक्याने विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला (Yogendra Yadav assaulted thrice in JNU). जमावाने विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात तोडफोडही केली. त्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव जेएनयूतील विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी पोहचले. यावेळी त्यांनाही धक्काबुक्की आणि मारहाण झाली. त्यात ते देखील जखमी झाले. विशेष म्हणजे हे सर्व समोर होत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप योगेंद्र यादव यांनी केला (Yogendra Yadav assaulted thrice in JNU).

जेएनयूतील हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांनी हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे अभाविपच्या नेत्यांनी डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

योगेंद्र यादव यांनी जेएनयूमध्ये त्यांच्यासोबत झालेल्या धक्काबुक्की आणि मारहाणीच्या 3 घटना नोंदवल्या आहेत. ते म्हणाले, “रविवारी (5 जानेवारी) रात्री माझ्यासोबत 3 वेळा मारहाण झाली. रात्री 9:30 वाजता मी जेएनयूमधील शिक्षकांशी बोलत होतो, तेव्हा नेम प्लेट नसलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने मला धक्का देत ओढले. त्यानंतर अभाविप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) लोकांनीही मला धक्का देण्यास सुरुवात केली. जेएनयूच्या संस्कृत विभागाचे प्राध्यापक मिश्रा देखील त्यांच्यासोबत होते. त्यांनी माझी मफलर ओढली आणि मला खाली पाडले. मला किरकोळ जखमा झाल्या. मी उठल्यानंतरही पोलीस मला धक्का देत होते.”

योगेंद्र यादव पुढे म्हणाले, ‘जवळपास रात्री 10:30 वाजता पुन्हा एकदा माझ्यावर हल्ला झाला. 20-30 गुंडांनी हल्ला केला. त्यावेळी मी डी. राजा यांच्यासोबत होतो. आम्ही राष्ट्रगीत म्हणत असताना संबंधित गुंडांनी आम्हाला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांनी माझ्या चेहऱ्यावरही लाथाने मारले. यावेळी पोलिसांनी बघ्यांची भूमिका घेतली. हे सर्व झाल्यावर पोलीस उपायुक्त तेथे आले. यानंतर मी उपचार करण्यासाठी एम्स (AIIMS) ट्रॉमा सेंटर येथे गेलो. तेथे रात्री 12:30 वाजता पोलीस निरिक्षक शिवराज यांनी माझा सहकारी राजा आणि माझ्या चालकाला मारहाण केली. त्यांनी अतिरिक्त पोलीस उपायुक्त परविंदर सिंह यांच्यासमोर मला धक्के दिले. मी जखमी आहे हे माहिती असूनही त्यांनी मला धक्काबुक्की केली.’

जेएनयूतील विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी याविरोधात आंदोलने होत आहेत. रविवारी (5 जानेवारी) रात्री मुंबईत गेटवे ऑफ इंडियाजवळ विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढला. अलीगड मुस्लिम यूनिवर्सिटीमध्ये देखील कँडल मार्च काढण्यात आला. राहुल गांधी, प्रियांका गांधी, पी. चिदंबरम, अरविंद केजरीवाल, वृंदा करात यांच्यासह अनेक बॉलीवूड कलाकारांनी या घटनेचा निषेध केला आहे. तसेच हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अभिनेत्री स्वरा भास्करला अश्रू अनावर

विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करची आई जेएनयू विद्यापीठाच्या प्राध्यापक आहेत. या हल्लादरम्यान त्याही विद्यापीठात होत्या. त्यांनी विद्यापीठातील दहशतीची माहिती स्वराला दिली. त्यानंतर स्वराने ट्विटरवर एक आवाहन करत नागरिकांना जेएनयूतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मदतीसाठी विद्यापाठीच्या मुख्य गेटसमोर येण्याचं आवाहन केलं. यावेळी स्वतःला अश्रू अनावर झाले.

गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेचा निषेध करत दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांच्याशी चर्चा केली.

हिंसेसंदर्भातील व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रिनशॉट व्हायरल

 

‘RSS youth wing’ आणि ‘Left terror down down’ नावाच्या WhatsApp ग्रुपमधील चॅटचे काही स्क्रिनशॉट्स सध्या व्हायरल होत आहेत. यात जेएनयूतील हिंसेचं समर्थन करत आनंद व्यक्त केला जात आहे. दिल्‍ली पोलिसांनी याची दखल घेतली आहे. या स्क्रिनशॉट्सचाही तपास करणार असल्याची माहिती पोलिसांकडून दिली जात आहे.