
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे, मात्र तिसऱ्या शाही स्नानानंतर आता महाकुंभ मेळ्यात आलेल्या नागा साधुंच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. नागा साधू कुंभ मेळाव्यातील फक्त तीन शाही स्नान करतात. वसंत पंचमीला तिसरं शाही स्नान पार पडलं, त्यानंतर आता नागा साधुंनी आपापल्या आखाड्यांकडे प्रस्थान केलं आहे. कोणी तपस्येसाठी हिमालयात निघाले आहेत, तर काही जणांनी इतर ठिकाणी प्रस्थान केलं आहे. मात्र यानंतर देखील कुंभमेळावा सुरूच राहणार आहे. मात्र नागा साधू आणि संतांनी महाकुंभ मेळाव्यातून आपल्या आखाड्यांकडे प्रस्थान केल्यानं औपचारिकरित्या महाकुंभ मेळाव्याची सांगता झाली असं मानलं जातं. मात्र साधू संत जेव्हा महाकुंभ मेळाव्याचा निरोप घेतात, त्यापूर्वी ते कढी आणि भजांचं सेवन करतात. जेव्हा नागा साधू पुन्हा एकदा आपल्या आखाड्याकडे प्रस्थान करतात त्यापूर्वी त्यांच्यासाठी खास कढी आणि भजे तयार केले जातात.
हे कढी-भजे तयार करण्याचं काम तेथील स्थानिक नाभिक समाज करतो. या परंपरेकडे गुरु-शिष्याची परंपरा म्हणून देखील पाहिलं जातं. कुंभ मेळाव्यात प्रत्येक आखाड्यामध्ये ही परंपरा पाहायला मिळते. नाभिक समाज मोठ्या श्रद्धेनं तेथील साधुंना जेऊ घालतो. कुंभ मेळाव्यात असलेल्या आखाड्यातील साधू-संताच्या संख्येनुसार हे कढी-भजे तयार केले जातात
कढी किती लीटर बनवली जाते?
जर आखाडा छोटा असेल तर अंदाजे 50-100 लीटर कढी बनवली जाते. मध्यम स्वरुपाचा आखाडा असेल तर 200-500 लीटर कढी बनवली जाते. जर आखाड्यां स्वरुप हे प्रचंड असेल तर 1000 लीटर पेक्षा अधिक कढी बनवली जाते. तेवढ्याच प्रमाणात भजे देखील तयार केले जातात. नागा साधू कुंभ मेळाव्यातून पुन्हा आपल्या मुळ ठिकाणी परताना कढी भजे खातात व त्यानंतरच ते प्रस्थान करतात. त्याशिवाय ते प्रस्थान करत नाहीत. शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे.
भारतात कढी, भजाला कधीपासून सुरुवात झाली?
कढी आणि भजे या पदार्थांचा समावेश भारतामधील प्राचीन पदार्थांमधे होतो. अनेक प्राचीन ग्रथांमध्ये सुद्धा या दोन पदार्थांचा उल्लेख आढळतो. हे दोन पदार्थ राज्यस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये मोठ्या आवडीने खाल्ले जातात.मात्र प्रत्येक राज्यामध्ये त्याची बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे.