स्टालिन यांचा हिंदीवर हल्ला… अश्विनी वैष्णव यांचा राहुल गांधी यांना थेट सवाल; म्हणाले, तुम्ही सहमत आहात?

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी हिंदी भाषेवर केलेल्या टीकेनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्टालिन यांच्यासह राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. स्टालिन यांनी हिंदीने अनेक भाषांना गिळंकृत केल्याचा दावा केला होता, तर वैष्णव यांनी स्टालिन यांच्या भूमिकेबाबत राहुल गांधींचे मत जाणून घेण्याची मागणी केली आहे.

स्टालिन यांचा हिंदीवर हल्ला... अश्विनी वैष्णव यांचा राहुल गांधी यांना थेट सवाल; म्हणाले, तुम्ही सहमत आहात?
rahul gandhi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 28, 2025 | 6:53 PM

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी हिंदी भाषेवर टीका केली आहे. हिंदी भाषांनी अनेक भाषांना गिळंकृत केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. त्यावरून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एमके स्टालिन यांच्यावर जोरदार टीका केली असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही सवाल केला आहे. स्टालिन यांच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? असा सवाल अश्विनी वैष्णव यांनी केला आहे. अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून हा सवाल केला आहे.

समाजात दुही माजवणाऱ्या अशा बकवास प्रयत्नांनी तुमचे खराब शासन कधीच लपलं जाऊ शकत नाही. आता विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी या विषयावर काय बोलणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. हिंदी भाषिक पट्ट्यातून निवडून आलेला खासदार म्हणून राहुल गांधी या मताशी सहमत आहेत का? असा सवाल, अश्विनी वैष्णव यांनी केला आहे.

 

स्टालिन काय म्हणाले होते?

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांनी एक ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी हिंदी भाषेवर टीका केली होती. इतर राज्यातील माझ्या बंधू आणि भगिनींनो, हिंदींनी किती भाषांना गिळंकृत केलंय याचा कधी तुम्ही विचार केलाय का? भोजपुरी, मैथिली, अवधी, ब्रज, बुंदेली, गढवाली, कुमाऊंनी, मगही, मारवाडी, छत्तीसगडी, संथाली, अंगिका, हो, खरिया, खोरठा, कुरमाली, कुरुख, मुंडारी आणि इतर असंख्य भाषा आता अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत. एका अखंड हिंदीची ओळख निर्माण करण्यासाठी प्राचीन मातृभाषा संपुष्टात येत आहेत. यूपी आणि बिहार कधीच हिंदी भाषेचा बालेकिल्ला नव्हता. आता त्यांच्या खऱ्या भाषा या इतिहासात जमा झाल्या आहेत, असं स्टालिन यांनी म्हटलं होतं.

स्टालिन यांच्या या ट्विटला टॅग करूनच अश्विनी वैष्णव यांनी राहुल गांधी यांना याबाबतचा सवाल केला आहे. स्टालिन यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? हिंदी भाषिक पट्ट्यातील एक खासदार म्हणून आता तुम्हाला काय म्हणायचं आहे? असा सवाल वैष्णव यांनी केला आहे. त्यामुळे राहुल गांधी आता काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.