
तुम्ही आजपर्यंत अनेक यशस्वी उद्योजगांच्या यशोगाथा वाचल्या आणि ऐकल्या असतील. अशीच एक यशोगाथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. केरळमधील त्रिशूर येथील एक तरूणाने 22 व्या वर्षी घर सोडत दुबईला जाण्याचा निर्णय घेतला. तो समुद्रमार्गे प्रवास करून दुबईला पोहोचला तेव्हा त्याच्या अंगावर फक्त एक लुंगी आणि शर्ट होता. मात्र हा माणूस एका मोठ्या समूहाचा मालक बनला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आज आपण दुबईतील प्रसिद्ध उद्योगपती एमव्ही कुन्हू मोहम्मद यांच्या प्रवसाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. कुन्हू यांनी गरिबीतून श्रीमंतीकडे केलेला प्रवास खुप प्रेरणादायी आहे. वयाच्या 22 व्या वर्षी भारत सोडून दुबईला जाणे आणि स्वतःची कंपनी स्थापन करून त्यात यश मिळवणे हे अनेकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. कुन्हू मोहम्मद हे 1967 मध्ये दुबईत पोहोचले. सुरुवातीला त्यांनी प्लंबर सहाय्यक म्हणून केले. महत्वाची बाब म्हणजे त्यांच्याकडे पासपोर्ट नव्हता, पैसेही नव्हते.
कुन्हू मोहम्मद यांनी केरळवरून ख्वाजा मोईदीन नावाच्या लाकडी बोटीने प्रवास सुरू केला. ही बोट 40 दिवसांनी ओमानमधील दिब्बा अल बाय येथे पोहोचली. मोहम्मद म्हणाले की, ‘आमच्या बोटीला इंजिन नव्हते, फक्त वारा आणि देवावरचा आमचा विश्वास यावर आम्ही प्रवास सुरु केला. आम्ही वाऱ्याच्या दिशेनुसार जहाजाचे शीड वळवत असायचो. कधी समुद्र शांत असायचा, कधी खवळलेला असायचा, मात्र मनातील विश्वासाने आम्ही हा प्रवास पूर्ण केला.’
कुन्हू मोहम्मद म्हणाले की, ‘जेव्हा बोट ओमानच्या किनाऱ्यावर पोहोचला तेव्हा मी समुद्रात उडी मारली. माझ्याकडे फक्त एक लुंगी आणि एक शर्ट होता. दोन्ही भिजले होते. मला त्यातील पाणी माझ्या हाताने पिळून काढावे लागले, त्यानंतर ती कपडे वाळवली आणि परत घातली.’ यानंतर मोहम्मद ओमान-युएई सीमेवरून युएईमध्ये पोहोचले. त्यानेळी दुबई आजच्या सारखी नव्हती, त्यानंतर खुप विकास झाला.
मोहम्मद यांनी प्लंबरच्या हाताखाली काम करण्यात सुरुवात केली, मात्र हाताला घाम येत असल्यामुळे तो औजारे व्यवस्थित पकडू शकत नव्हता, त्यामुळे त्याला काही दिवस सुट्टी घ्यायला सांगितली. काही दिवसांनी त्यांना समजले की कामावरून काढून टाकण्यात आले आहे. पण त्या मालकाने 20 दिवसांसाठी 100 रियाल दिले. तो त्यांचा पहिला पगार होता. मोहम्मद यांनी गायींचे दूध काढणे, भांडी साफ करणे अशी कामे केली.
मोहम्मदच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्याच्या मित्राने त्याची ओळख UAE तील रास अल खैमाहचे तत्कालीन शासक शेख सकर बिन मोहम्मद अल कासिमी यांच्याशी करून दिली. मोहम्मद सुरुवातीला त्यांचा ड्रायव्हर बनला. ते म्हणाले की, ‘मी त्यांच्याकडून विश्वास आणि जबाबदारीचे महत्त्व शिकलो. मला व्यवसाय करण्याची परवानगी होती. तेव्हापासून मी माझा व्यवसाय सुरु केला.
1972 मध्ये मोहम्मद कुन्हू यांनी जलील ट्रेडर्स नावाची कंपनी सुरु केली, नंतर त्याचे नाव जलील होल्डिंग्ज असे ठेवण्यात आले. मोहम्मदच्या कठोर परिश्रमाने ही कंपनी एका सामान्य किराणा दुकानातून ताज्या उत्पादनांच्या वितरण कंपनीपर्यंत वाढली. त्यानंतर रेस्टॉरंट आणि हॉटेल क्षेत्रातही प्रवेश केला. या कंपनीत सध्या 1700 लोक काम करतात. अशाप्रकारे अंगावरील कपड्यावर दुंबईला पोहोचलेले मोहम्मद कुन्हू हे एक यशस्वी उद्योजक बनले.