
IPS Abhijeet Patil : युपीएससी पास होण्यासाठी देशभरातून अनेक विद्यार्थी प्रयत्न करतात. त्यातील मोजकेच लोक ही अवघड परिक्षा उत्तीर्ण होतात. अनेक जण आयएएस होतात तर काही जण आयपीएस अधिकारी बनतात. तर काही जण अन्य भारतीय सेवेत जातात. असाच एक पोरगेलासा चेहरा असलेला मुलगा आयपीएस झाला आहे.त्याच्या चेहरा एकदम कोवळ्या मुलाचा असल्याने तो सध्या चर्चेत आहे. भारतीय पोलीस सेवेत जनरेशन झेड हा आयपीएस पाहाता क्षणी नुकताच कॉलेजमधून आलेला वाटतो. या इतक्या कमी वयात आयपीएस झालेल्या या अधिकाऱ्याचे नाव अभिजीत पाटील असे आहे.
अभिजीत पाटील हे राजस्थान कॅडरचे सर्वात कमी वयाचे आयपीएस अधिकारी ठरले आहेत. एवढ्या कमी वयात खांद्यावर मोठ्या जबाबदारीचे आयपीएस बिरुद लागले आहे. त्यांच्या खांद्यावर कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे.
अभिजीत पाटील यांना IPS च्या वर्दीत पाहून अनेकांना डोळ्यांवर विश्वास बसत नाही. अभिजीत पाटील यांची सक्सेस स्टोरी इतर आयपीएस अधिकाऱ्यांहून वेगळी आहे. कारण त्यांनी UPSC ची सिव्हील परिक्षा कोणत्याही कोचिंग शिवाय पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे. त्यांनी अवघ्या २२ व्या वर्षी ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
आयपीएस अभिजीत पाटील यांचा जन्म 11 जून 1999 रोजी महाराष्ट्राच्या ठाणे शहरात झाला. त्यांचे वडील तुलसीराम पाटील आणि आई आशा देवी सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्त झाले आहेत. त्यांचे वडील तुलसीराम पाटील हे मुंबई महानगर पालिकेत चीफ ऑडीटर तर आई सिंचन खात्यात कामाला होती. अभिजित पाटील त्यांच्या पालकांना घरातील दोन बहिणींच्या पाठीवर झाले एकुलते एक पूत्र आहेत.
अभिजीत पाटील यांनी सिव्हील सेवा परिक्षा 2022 मध्ये अखिल भारतीय स्तरावर 470रँक मिळाली आहे. ते केवळ 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात युपीएससी पास झाले. अभिजीत पाटील राजस्थान कॅडरचे सर्वात तरुण आयपीएस बनले आहेत. राजस्थान कॅडरच्या 2023 बॅचच्या IPS अधिकारी असलेल्या अभिजीत पाटील हे साल 2026 मध्ये आता 26 वर्षांचे आहेत.
अभिजीत पाटील यांना आयपीएस सर्व्हीस कॅडरचे वाटप अवघ्या 23 व्या वयात झाले. त्यामुळे ते भारताचे चौथे -पाचवे सर्वात तरुण आयपीएस अधिकारी बनले आहेत. याआधी गुजरात कॅडरचे IPS अधिकारी सफीन हसन (Safin Hasan) यांनी देखील 22 व्या वयात 2018 मध्ये युपीएससी पास होत सर्वात कमी वयाचे आयपीएस बनण्याचा मान मिळवला होता. सफीन हसन गुजरातच्या पालनपुरच्या सर्वसाधारण कुटुंबातील आहेत.