तामिळनाडूत मोठी उलथापालथ, विजय मुख्यमंत्री होताच तब्बल 25 आमदारांवर… राजकारणात खळबळ!

Tamil Nadu Politics : थलापली विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज बहुमत चाचणी पार पडली. यावेळी AIADMK च्या बंडखोर आमदारांनी विजय यांच्या सरकारला पाठिंबा दिला, त्यामुळे आता या आमदारांवर कारवाई सुरू झाली आहे.

तामिळनाडूत मोठी उलथापालथ, विजय मुख्यमंत्री होताच तब्बल 25 आमदारांवर... राजकारणात खळबळ!
Tamil Nadu Politics
Image Credit source: Google
| Updated on: May 13, 2026 | 9:46 PM

विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून तामिळनाडूच्या राजकारणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. थलापली विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज बहुमत चाचणी पार पडली. या चाचणीदरम्यान विजय यांच्या TVK सरकारला मतदान करणाऱ्या AIADMK च्या बंडखोर आमदारांवर आता कारवाई सुरू झाली आहे. पक्षाने सी. व्ही. शणमुगम, एस. पी. वेलुमणी आणि विजयभास्कर यांच्यासह अनेक आमदारांना पक्षातील महत्त्वाच्या पदांवरून हटवले आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

25 आमदारांना पक्षपदांवरून हटवलं

AIADMK चे महासचिव एडापडी के पलानीस्वामी यांनी बुधवारी सांगितले की, वेलुमणी, शणमुगम आणि विजयभास्कर यांच्यासह अनेक नेत्यांना त्यांच्या पक्षपदांवरून हटवण्यात आले आहे. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करून विधानसभा विश्वासदर्शक ठरावावेळी TVK सरकारच्या बाजूने मतदान करणाऱ्या नाथम आर. विश्वनाथम यांच्यासह इतर बंडखोर आमदारांवरही कठोर कारवाई करण्यात आली आहे. पलानीस्वामी यांनी या 25 आमदारांच्या पदांमध्ये बदल करत त्यांच्या जागी नवीन जिल्हा सचिवांची नियुक्ती केली आहे.

सरकारला 144 आमदारांचा पाठिंबा

समोर आलेल्या माहितीनुसार AIADMK ने 13 विद्यमान आमदारांसह 29 नेत्यांना विविध पदांवरून हटवले आहे. यात आर. कामराज, थंगामणी, के. पी. अन्बझगन, बेंजामिन, उदुमलाई राधाकृष्णन, एसाकी सुब्बैया, एम. सी. संपत, के. सी. वीरमणी आणि एम. आर. विजयभास्कर या बड्या नावांचाही समावेश आहे. शणमुगम आणि वरिष्ठ नेते एस. पी. वेलुमणी यांच्या समर्थनार्थ एकत्र आलेल्या 25 AIADMK आमदारांच्या क्रॉस-वोटिंगमुळे TVK सरकारचे बहुमत अधिक मजबूत झाले असून सरकारला 144 आमदारांचा पाठिंबा मिळाला.

DMK चे वॉकआउट

आज झालेल्या बहुमत चाचणीत DMK च्या आमदारांनी सभागृहातून वॉकआउट केले, तर PMK ने मतदानात भाग घेतला नाही. भाजपच्या एकमेव आमदाराने तटस्थ भूमिका घेतली. तर पलानीस्वामी यांच्याशी निष्ठावान असलेल्या 21 AIADMK आमदारांनी सरकारविरोधात मतदान केले. बंडखोर नेते सी. व्ही. शणमुगम यांनी म्हटले की, ‘TVK आणि AIADMK यांचा वैचारिक अजेंडा समान आहे. दोन्ही पक्ष DMK ला विरोध करतात. त्यामुळेच विरोधी पक्षातील काही आमदारांनी बहुमत चाचणीदरम्यान सरकारला समर्थन दिले.’

Follow Us