Tamilnadu violence : विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर आक्रमक आंदोलकांनी जाळल्या स्कूल बस, पोलिसांवर दगडफेक; वाचा, काय घडलं?

| Updated on: Jul 17, 2022 | 2:39 PM

पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स खाली ढकलून आंदोलकांनी जवळच्या चिन्नासेलम येथील शाळेच्या आवारात घुसून संस्थेच्या आवारात उभ्या असलेल्या बसेस पेटवून दिल्या, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Tamilnadu violence : विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर आक्रमक आंदोलकांनी जाळल्या स्कूल बस, पोलिसांवर दगडफेक; वाचा, काय घडलं?
विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर आक्रमक आंदोलक
Image Credit source: ANI
Follow us on

चेन्नई : तामिळनाडूतील कल्लाकुरिची (Kallakurichi) येथे हिंसाचार उसळला आहे. रविवारी बारावीच्या विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर न्याय देण्याची मागणी करत संतप्त जमावाने शाळेत घुसून तोडफोड केली. यासोबतच स्कूल बसेसही जाळण्यात आल्या आहेत. या दरम्यान घटनास्थळी मोठ्या संख्येने संतप्त नागरिक दिसून आले. परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. त्याचवेळी या घटनेची माहिती देताना तामिळनाडूच्या डीजीपींनी शाळकरी मुलीचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी (TN Police) याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती तामिळनाडूच्या डीजीपींनी दिली आहे. मुलीचे आणखी एक शवविच्छेदन (Post mortem) व्हावे यासाठी तिच्या पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रविवारी आंदोलनासाठी जमाव शाळेत पोहोचला होता. याला सामोरे जाण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. मात्र तरीही मोठ्या संख्येने लोक तेथे पोहोचले.

घटनास्थळी 500 पोलीस

डीजीपी म्हणाले, की लोकांनी शांततेच्या मार्गाने नाही, तर हिंसक स्वरुपात आंदोलन केले आहे. पोलिसांनी लाठीमार करून त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला. 500 पोलीसही घटनास्थळी पाठवण्यात येत आहेत. शाळेवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींवर कारवाई करणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. कोणालाही सोडले जाणार नाही. या घटनेचे व्हिडिओ फुटेजही पोलिसांकडे उपलब्ध आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स खाली ढकलून आंदोलकांनी जवळच्या चिन्नासेलम येथील शाळेच्या आवारात घुसून संस्थेच्या आवारात उभ्या असलेल्या बसेस पेटवून दिल्या, असे पोलिसांनी सांगितले आहे. हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी कल्लाकुरिची जिल्हा पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. या घटनेत 10हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत.

नेमके काय घडले?

पोलिस महासंचालक सी. सिलेंद्र बाबू यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आणि हिंसाचार न करण्याचे आवाहन केले आहे. हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. कल्लाकुरिची जिल्ह्यातील चिन्ना सेलम येथील एका खासगी उच्च माध्यमिक शाळेतील बारावीच्या विद्यार्थिनीने मंगळवारी रात्री शिक्षकांवर छळाचा आरोप करून आत्महत्या केली. वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत राहणाऱ्या या तरुणीने वरच्या मजल्यावरून जमिनीवर उडी घेऊन जीवन संपवले आहे.

शवविच्छेदन अहवालात काय?

शवविच्छेदन अहवालानुसार, तिच्या मृत्यूपूर्वी तिला जखमा झाल्या होत्या. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. तिच्या मृत्यूमुळे धक्का बसलेले तिचे आई-वडील, नातेवाईक आणि कुड्डालोर जिल्ह्यातील वेप्पूर येथील पेरियानासलूर या गावातील लोक न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.

आंदोलकांच्या मागण्यांना राजकीय पक्षांचा पाठिंबा

शाळा प्रशासनाला दोषी ठरवत त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी त्यांनी 16 जुलै रोजी सलग चौथ्या दिवशीही आंदोलन केले. घटनेची सीआयडी चौकशी करावी, मुलीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांना अटक करावी, अशा मागण्या आक्रमक आंदोलकांनी केल्या आहेत. तर त्यांच्या या मागण्यांना राजकीय संघटना आणि डाव्या पक्षाच्या युवा शाखेचा पाठिंबा आहे.