बिहारमध्ये ठरायचं आणि त्यानंतर… पेपर लीक प्रकरणात मास्टरमाइंडची बायकोही; मोठं नेटवर्क एक्सपोज होणार?
टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा मास्टरमाइंड बीरेंद्र कुमार गुप्ताला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याला आता भिवंडी कोर्टात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात बीरेंद्रची पत्नी सुमन गुप्ताचाही सहभाग असल्याचा संशय आहे. बीरेंद्रच्या अटकेमुळे पेपरफुटीचे मोठे आंतरराज्यीय नेटवर्क समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रकरणी ठाणे पोलिसांना मोठं यश आलं आहे. या प्रकरणातील मुख्य मास्टरमाइंड बीरेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. बीरेंद्र कुमार गेल्या अनेक महिन्यापासून फरार होता. ठाणे पोलिसांनी बिहारमध्ये छापा मारून त्याला अटक केली. त्यानंतर त्याला पुणे एअरपोर्टवर आणण्यात आले. आता त्याला पुढील चौकशीसाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी भिवंडीत आणण्यात येणार आहे. बीरेंद्रला अटक करण्यात आल्यामुळे पेपर लीक प्रकरणाचं मोठं नेटवर्क समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक राज्यात आरोपीचं नेटवर्क असल्याचंही सांगितलं जात आहे.
टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंड बीरेंद्र कुमार गुप्ता अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. बीरेंद्र कुमारच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. तो बिहारच्या समस्तीपूरचा रहिवाशी आहे. तो पेपरफुटीचं सिंडिकेट चालवायचा. बिहारमध्येच सर्व गोष्टी ठरायच्या आणि नंतर त्या देशभर पोहोचायच्या अशी माहिती समोर आली आहे. ठाणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपासादरम्यान देशातील विविध राज्यात छापेमारी केली.
कोर्टात हजर करणार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेपरफुटी प्रकरणात बीरेंद्र कुमार गुप्ता याची बायको सुमन गुप्ताही सामिल आहे. कथित पेपर लीक नेटवर्क चालवणं आणि अवैध देवाणघेवाण करण्यासाठी तिची भूमिका होती. मात्र, तिची या प्रकरणात किती भूमिका होती, याचा पोलीस तपास करत आहे. दरम्यान, बीरेंद्रला पोलिसांनी विमानाने पुणे एअरपोर्टवर आणलं. त्याला प्रचंड पोलीस बंदोबस्तात भिवंडीला आणण्यात येणार आहे. त्याला भिवंडी कोर्टात हजर केलं जाणार आहे.
दोघेही एकाच गावचे
पोलिसांच्या तपासात यापूर्वी अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सोनू सिंह याच्याशी संबंधित ठिकाणांवरील प्रिंटिंगमधूनच लीक प्रश्नपत्रिकांची छपाई करण्यात आली होती, असा पोलिसांना संशय आहे. तसेच बीरेंद्र कुमार गुप्ता आणि सोनू सिंह यांच्यात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या कनेक्शनचाही पोलीस तपास करत आहेत. विशेष म्हणजे सोनू सुद्धा बिहारच्या समस्तीपूरचा रहिवाशी असल्याचं उघड झालं आहे.
तिघे ताब्यात
टीईटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी आधीच राजीव कुमार, आकाश कुमार आणि धीरज कुमार यांना अटक केली आहे. 27 जून रोजी भिवंडी पोलिसांना पेपरफुटी प्रकरणी माहिती मिळाल्यानंतर छापा टाकत या तिघांना ताब्यात घेतलं होतं. हे तिघेही दिल्लीतून ठाण्यात आले होते. त्यांच्याकडून टीईटी परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांचा संच देखील मिळून आला होता. त्यानंतर 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा रद्द करण्यात आली होती.