
Vijay Rally Stampede : तामिळनाडूतील करूर इथं अभिनेते विजय यांच्या राजकीय रॅलीमध्ये शनिवारी संध्याकाळी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर घटनास्थळी अत्यंत भयानक दृश्य पहायला मिळालं. चपलांचा खच, फेकलेल्या पाण्याच्या बाटल्या, पक्षांचे फाटलेले झेंडे, कपड्यांचे तुकडे, कागदांचा खच आणि जागोजागी कचरा.. असं दृश्य सभास्थळी पहायला मिळालं. हे दृश्य मन हेलावून टाकणारं होतं. “या दुर्दैवी घटनेत 39 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. 17 महिला, 13 पुरुष, 4 मुलं आणि 5 मुलींनी आपला जीव गमावला आहे. 39 मृतांपैकी 30 जणांचे शवविच्छेदन करण्यात आले आहेत. त्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले आहेत”, अशी माहिती तमिळनाडूचे आरोग्य सचिव पी. सेंथिल कुमार यांनी दिली.
26 जखमींवर ओपीडीमध्ये उपचार करण्यात आले आणि 67 जणांना आयपीडीमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी दोन रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. आरोग्य सचिवांनी याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी करूर इथल्या प्रतिबंधित क्षेत्राला वेढा घालत तो भाग सर्वसामान्यांसाठी बंद केला होता.
सभेसाठी 30 हजार नागरिकांच्या उपस्थितीचा अंदाज असताना प्रत्यक्षात मात्र 60 हजारांवर नागरिक सभास्थळी उपस्थित होते. विजय हे लोकप्रिय अभिनेते असून त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. सभेच्या ठिकाणी विजय यांचं आगमन झाल्यानंतर भाषणाला सुरुवात होताच चेंगराचेंगरी झाली. यावेळी नागरिकांची पळापळ झाल्याने अनेकजण एकमेकांच्या अंगावर कोसळून बेशुद्ध पडले. जखमींना तत्काळ करूर सरकारी रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, या घटनेनंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
केंद्रीय गृहमंत्रालयाने या घटनेबाबत राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. ‘तमिळनाडूतील करूर इथं घटलेली घटना अत्यंत दु:खद आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावलं, त्यांना माझ्या संवेदना, जखमी झालेले लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला.
‘तमिळनाडूतील करूर इथल्या सभेत घडलेल्या दु:खद घटनेनं प्रचंड वेदना दिल्या आहेत. या असह्य दु:खाच्या क्षणी ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय, त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि तमिळनाडूच्या जनतेप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर उपचार मिळावेत आणि ते लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो’, असं उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन म्हणाले.