TVK Vijay : तमिळनाडूमध्येही ‘लाडक्या बहिणी’ची जादू; ‘या’ 7 आश्वासनांमुळे थलपतीचा ‘विजय’

Tamilnadu Assembly Election Result 2026 : तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत मोठा उलटफेर पहायला मिळतोय. थलपती विजय यांच्या टीव्हीकेनं पदार्पणातच दमदार कामगिरी केली आहे. महाराष्ट्रातील 'लाडकी बहीण' योजनेला टक्कर देणारं आश्वासन थलपती विजय यांच्या पक्षाने जाहिरनाम्यात दिलं होतं.

TVK Vijay : तमिळनाडूमध्येही लाडक्या बहिणीची जादू; या 7 आश्वासनांमुळे थलपतीचा विजय
Thalapathy Vijay
Image Credit source: Instagram
| Updated on: May 04, 2026 | 11:12 AM

तमिळनाडूच्या राजकारणात अभिनेते थलपती विजय यांच्या प्रवेशाने नवीन खळबळ निर्माण केल्याचं पहायला मिळतंय. आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेनं जोरदार प्रभाव पाडला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांनुसार, थलपती विजय यांचा टीव्हीके 100 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील हा सर्वांत मोठा बदल आहे. विशेष म्हणजे विजय यांनी जाहीरनाम्यात जी आश्वासनं दिली होती, त्यांचा निवडणुकीत मोठा प्रभाव पडल्याचं म्हटलं जात आहे. आधी मध्यप्रदेशात आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला राज्य सरकारकडून आर्थिक मदत दिली जातेय. या योजनेचा निवडणुकीच मोठा फायदा झाल्याचंही पाहायला मिळालं. त्याच धर्तीवर विजय यांच्या पक्षानेही जाहिरनाम्यात अशाच पद्धतीची योजना सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं.

  • टीव्हीकेच्या प्रमुख कल्याणकारी आश्वासनांमध्ये गृहिणींना दरमहा 2500 रुपये देण्याचा समावेश आहे. यासोबतच पदवीधारांना 4000 रुपये आणि डिप्लोमा धारकांना 2500 रुपये बेरोजगारी भत्ता देण्याचं आश्वासन आहे. इंटर्नशिपसाठी 5000 ते 8000 रुपयांचं विद्यावेतन दिलं जाईल, असंही त्यात सांगण्यात आलं आहे. तर पाच लाख तरुणांसाठी 18000 रुपयांची रोजगार संबंधित सहाय्यता योजनाही प्रस्तावित आहे.
  • अन्नपूर्णा सुपर सिक्स योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 6 एलपीजी सिलिंडर मोफत देण्याचं आश्वासन देण्यात आलं.
  • याव्यतिरिक्त टीव्हीकेनं ‘अण्णन सीर थिट्टम’योजनेदरम्यान बहिणी आणि मुलींच्या लग्नासाठी 8 ग्रॅम सोनं दान करण्याचं वचन दिलं. इतकंच नव्हे तर रेशमी साड्या दान करण्याच्या योजनेनंही लक्ष वेधून घेतलं.
  • शिक्षणावर लक्ष केंद्रीत करत इयत्ता पहिली ते बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 15 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली.
  • महिलांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी त्यांना सरकारी बसमधून मोफत प्रवासाचं आश्वासन देण्यात आलं होतं.
  • ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि अपंग व्यक्तींना दरमहा 3000 रुपये दिले जातील आणि पेन्शन योजनेची व्याप्ती 15 लाख लोकांपर्यंत वाढवली जाईल. या जाहिरनाम्यात महिलांसाठीच्या विशेष योजनांचाही उल्लेख आहे.
  • मूलभूत सुविधांअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 200 युनिट मोफत वीज, नळाद्वारे पिण्याचं पाणी आणि सहा मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. मजुरांसाठी, अंगणवाडी सेविकांना 18000 रुपये, स्वच्छता कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये देण्याचा प्रस्ताव आहे.
Follow Us