Thalapathy Vijay: थलापती विजय यांचे TVK सरकार सहा महिन्यांत कोसळणार, स्टॅलिन पुन्हा मुख्यमंत्री होणार; भविष्यवाणी खरी ठरणार का?

Thalapathy Vijay: थलपथी विजय यांच्या सरकारबाबत एक मोठा दावा करण्यात आला आहे.मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचे टीव्हीके सरकार येत्या सहा महिन्यांत कोसळेल, असे भाकीत केले आहे. आता ही भविष्यवाणी नेमकं कोणी केली आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Thalapathy Vijay: थलापती विजय यांचे TVK सरकार सहा महिन्यांत कोसळणार, स्टॅलिन पुन्हा मुख्यमंत्री होणार; भविष्यवाणी खरी ठरणार का?
thalapathy vijay
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 18, 2026 | 1:03 PM

तामिळनाडूमध्ये अभिनेता थलपती विजय यांनी सत्ता स्थापन केली. त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्या सरकारबाबत एकग मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे. थलापती विजय यांचे टीव्हीके (TVK) सरकार ६ महिनेही टिकू शकणार नाही. तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय आणि त्यांच्या टीव्हीके पक्षाचे युती सरकार सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही. तसेच, डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन हे लवकरच पुन्हा सत्तेत परततील अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे. आता ही भविष्यवाणी कोणी केली आहे? ही भविष्यवाणी खरी ठरणार का? असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहे.

डीएमकेचे ज्येष्ठ नेते आणि तिरुचेंदूरचे आमदार अनिता राधाकृष्णन यांनी ही भविष्यवाणी केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय आणि त्यांच्या टीव्हीके पक्षाचे युती सरकार सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच, डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन हे लवकरच पुन्हा सत्तेत परततील, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. दक्षिण तामिळनाडूतील एका पक्षीय कार्यक्रमादरम्यान, राधाकृष्णन यांनी सत्ताधारी टीव्हीकेचे ज्येष्ठ नेते आधव अर्जुन यांना आव्हान दिले की, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि तिरुचेंदूरमधून त्यांच्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी. आधव अर्जुन यांनी विलीवक्कम मतदारसंघातून विजय मिळवला होता.

‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार, डीएमके नेते राधाकृष्णन म्हणाले, ‘या सरकारकडे आता फक्त चार महिने उरले आहेत. आधव अर्जुन नावाचा एक व्यक्ती आहे. जर हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या, मीही राजीनामा देतो. तिरुचेंदूरमध्ये समोरासमोर निवडणूक लढवूया. हा आमचा गड आहे, आम्ही कोणाचाही पराभव करू.’ तिरुचेंदूर हा मतदारसंघ गेल्या २५ वर्षांपासून राधाकृष्णन यांचा बालेकिल्ला राहिला आहे. २००१ मध्ये त्यांनी पहिल्यांदा डीएमकेचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या एआयएडीमके (AIADMK) कडून ही जागा जिंकली होती. त्यानंतर त्यांनी डीएमकेमध्ये प्रवेश केला आणि २००९ पासून ही जागा आपल्याकडेच राखली.

‘स्टॅलिन होणार मुख्यमंत्री’

राधाकृष्णन यांनी स्टॅलिन यांच्या पराभवाचाही बचाव केला. कोलाथुर मतदारसंघातून डीएमकेचेच नाराज नेते व्ही. एस. बाबू यांनी स्टॅलिन यांचा पराभव केला होता. यावर बोलताना राधाकृष्णन म्हणाले की, आमचे ‘थलैवर’ (नेते) एम. के. स्टॅलिन यांनी त्रिचीमधून निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा आहे. स्टॅलिन यांनी कोलाथुरचा विकास करून त्याला सिंगापूरसारखे बनवले आहे. ते पुढे म्हणाले, “‘थलैवर’ हेच पुढील मुख्यमंत्री आहेत. चार किंवा सहा महिन्यांनंतर आमचे नेते पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील.”

दरम्यान, थलापती विजय यांचे कार्यालय किंवा टीव्हीके पक्षाकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु, हे वक्तव्य टीव्हीके आणि डीएमके यांच्यातील वाढती कटुता स्पष्ट करणारे आहे. यावरून तामिळनाडूच्या निकालांनंतर डीएमके आणि एआयएडीमके यांच्यात सत्तेसाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली झाल्याचे स्पष्ट होत आहे.

थलापती विजय यांचे सरकार बनण्यापूर्वी झाला मोठा हायड्रॉमा

वास्तविक पाहता, थलापती विजय यांचा निवडणूक विजय हा तामिळनाडूच्या इतिहासातील अनेक दशकांतील सर्वात मोठ्या राजकीय उलटफेरांपैकी एक होता. टीव्हीकेने राज्यातील २३४ जागांपैकी तब्बल १०८ जागांवर विजय मिळवून डीएमके आणि एआयएडीमके या दोन्ही पक्षांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. मात्र, टीव्हीके बहुमताच्या आकड्यापासून १० जागा दूर होती. यामुळे तामिळनाडूमध्ये जवळपास १० दिवस राजकीय अनिश्चितता आणि गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले होते.

Follow Us