भारताच्या या राज्यात आहेत सर्वाधिक रेल्वे स्थानके, पाहा कोणते राज्य ?
भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. देशभरात ७०,००० हून अधिक रेल्वे स्थानके आहेत. पण तुम्हाला हे माहिती आहे का भारतात सर्वात जास्त रेल्वे स्थानके कोणत्या राज्यात आहेत?

भारतीय रेल्वे जगातील चौथे सर्वात मोठे नेटवर्क आहे. रेल्वेतून दररोज अडीच कोटी प्रवासी प्रवास करीत असतात. भारतीय रेल्वेला जीवनवाहिनी म्हटले जाते. देशात रेल्वेचे नेटवर्क सतत वाढत असून भारतीय रेल्वे विविध प्रकारच्या रेल्वे चालवित असते. रेल्वेची स्थानके जम्मू ते कन्याकुमारीपर्यंत पसरली आहेत. रेल्वेची स्थानके कोणत्या राज्यात सर्वाधिक आहेत याचा धांडोळा घेतला असता आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.
उत्तर प्रदेशात रेल्वेची सर्वाधिक स्थानके आहेत. येथे सुमारे ५५० रेल्वे स्थानके आहेत. यातील २३० स्थानके ही उत्तर मध्य रेल्वे झोनमध्ये आहेत.तर उर्वरित १७० रेल्वे स्थानके उत्तर -पूर्व रेल्वे झोनमध्ये आहेत. गोरखपूर रेल्वे स्थानक हे उत्तर प्रदेशातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. याच यादीत मथुरा जंक्शन आणि कानपूर जंक्शन देखील सामील आहेत. जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म पश्चिम बंगालच्या खड़गपुर येथे होता. त्याची लांबी १०७२.५ मीटर होती. त्यानंतर पुनर्विकासानंतर उत्तर प्रदेशातील गोरखपुर जंक्शनच्या प्लॅटफॉर्म नंबर-१ आणि २ ची संयुक्त लांबी १३६६.४ मीटर झाली, त्यानंतर तो लांब प्लॅटफॉर्म झाला. मात्र आता कर्नाटक राज्यातील हुबळी येथे श्री सिद्धरुद्ध स्वामीजी रेल्वे स्थानकावर जगातील सर्वात मोठे रेल्वे प्लॅटफॉर्म बांधला आहे. या रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबीच जवळपास १५०७ मीटर आहे. या रेल्वे प्लॅटफॉर्मचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदले गेले आहे. हा प्लॅटफॉर्म बांधण्यासाठी एकूण २० कोटी रुपयांहून अधिक खर्च आला आहे.
भारतीय रेल्वेचा जन्म
भारतीय रेल्वेची सुरुवात १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ( मुंबई ) ते ठाणे या स्थानकांदरम्यान सुरु झाली होती. भारतीय रेल्वेचे जाळे सर्वदूर पसरले आहे. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा चीन रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत आपल्याही मागे होता. आता मात्र चीन रेल्वे तंत्रज्ञानात सर्वात पुढे गेला आहे. तर भारतीय रेल्वेच्या स्थानकांचा विचार केला तर भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात रेल्वेची सर्वाधिक स्थानके आहेत.
