बिरसा मुंडा यांच्या ‘उलगुलान’नंतरचा हा सर्वात मोठा आदिवासी मेळावा, लाल किल्ल्यावरून अमित शहांचे विधान
अमित शाह यांनी दिल्लीतील लाल किल्ला मैदानावर आयोजित भव्य जनजातीय सांस्कृतिक समागमात सुमारे 1.5 लाख आदिवासी बांधवांना संबोधित केले. यावेळी त्यांनी बिसरा मुंडा यांच्या कार्याचा गौरव केला.

नवी दिल्ली, 24 मे : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील लाल किल्ला मैदानावर आयोजित भव्य जनजातीय सांस्कृतिक समागमात सुमारे 1.5 लाख आदिवासी बांधवांना संबोधित केले. त्यांनी या कार्यक्रमाला जनजातीय महाकुंभ असे संबोधत, हा समागम पुढील अनेक वर्षे आदिवासी समाजाच्या अस्तित्व, अस्मिता आणि संस्कृतीच्या चळवळीला नवी ओळख देणारा ठरेल, असे म्हटले.
या कार्यक्रमात अमित शाह यांनी बिसरा मुंडा यांना अभिवादन करताना सांगितले की, ‘मी भगवान बिरसा मुंडा यांना पाहिले नाही, पण आज येथे उपस्थित जनजातीय समाजात त्यांची प्रतिमा दिसत आहे. त्यांनी जल, जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी बिरसा मुंडा यांनी केलेल्या संघर्षाचा उल्लेख करत तो सार्वत्रिक संदेश असल्याचे सांगितले. तसेच, प्रकृतीपूजा ही सनातन संस्कृतीची मूलभूत ओळख आहे, असेही ते म्हणाले.
समान नागरी संहिता (UCC) संदर्भात बोलताना अमित शाह यांनी आदिवासी समाजाला आश्वस्त केले की, हा कायदा त्यांना प्रभावित करण्याच्या उद्देशाने बनवलेला नाही. त्यांनी हेही नमूद केले की, आदिवासी कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचे काम माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरू केले होते.
जनजाती सुरक्षा मंचाचे राष्ट्रीय संयोजक गणेश राम भगत यांनी धर्मांतराच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी धर्मांतराला समाजासाठी ‘कॅन्सर’ संबोधत, आदिवासी संस्कृती आणि परंपरांच्या संरक्षणासाठी एकजूट होण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय सहसंयोजक डॉ. राज किशोर हांसदा यांनी धर्मपरिवर्तन स्वीकारणार नाही अशी भूमिका स्पष्ट करत, संस्कृती वाचवण्यासाठी जागरूक राहण्याची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमात हर्ष चौहान यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात 700 हून अधिक जनजातीय समाजांनी ब्रिटिशांविरोधात संघर्ष केल्याचा उल्लेख केला. तर तेची गुबिन यांनी धर्मांतर स्वीकारणाऱ्यांना आरक्षणाचा दुहेरी लाभ मिळू नये, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली. बुधरी ताती यांनी मातृशक्तीच्या भूमिकेवर भर देत समाजाच्या संरक्षणासाठी महिलांनी पुढे यावे, असे आवाहन केले.
जनजातीय आयोगाचे सल्लागार आणि माजी न्यायाधीश प्रकाश उईके यांनी सांगितले की, मिशनऱ्यांच्या दबावामुळे बिरसा मुंडा यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. मात्र, तुरुंगात असतानाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची भीती ब्रिटिश सत्तेला वाटत होती. वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्येंद्र सिंह यांनी बिरसा मुंडा यांना सर्व जनजातीय समाजाचे आदर्श पुरुष म्हटले.
हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आला होता. देशभरातील विविध राज्यांतून सुमारे 1.5 लाख आदिवासी प्रतिनिधी आणि समाजबांधव या कार्यक्रमात सहभागी झाले. अंदमान आणि निकोबार बेटांवरूनही विशेष प्रतिनिधीमंडळ उपस्थित होते.
राजघाट चौक, रामलीला मैदान, अजमेरी गेट, कुदसिया बाग आणि शास्त्री पार्क परिसरातून भव्य शोभायात्रा लाल किल्ला मैदानावर पोहोचली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिल्ली पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने विशेष सहकार्य केले. देशभरातून आलेल्या सहभागींसाठी दिल्लीतील 79 ठिकाणी निवासव्यवस्था करण्यात आली होती.