What India Thinks Today: देश प्रवचन, कीर्तनांनी सुधारला नाही, तमाशाने बिघडला नाही; गडकरी म्हणतात, प्रदूषित राजकारण नकोच

| Updated on: Jun 17, 2022 | 5:16 PM

What India Thinks Today: केंद्र सरकारची अग्निपथ योजना चांगली आहे. फक्त ती समजून घेतली पाहिजे. लोकांना या योजनेची जशी माहिती मिळेल तसा विरोध संपुष्टात येईल, असं त्यांनी सांगितलं.

What India Thinks Today: देश प्रवचन, कीर्तनांनी सुधारला नाही, तमाशाने बिघडला नाही; गडकरी म्हणतात, प्रदूषित राजकारण नकोच
गडकरी म्हणतात, प्रदूषित राजकारण नकोच
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

What India Thinks Today Global Summit: टीव्ही9 ने ग्लोबल समिट व्हॉट इंडिया थिंक्स टुडेचं (What India Thinks Today Global Summit) आयोजन केलं आहे. देशाचे परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या परिषदेत भाग घेऊन आजचा दिवस गाजवला. गडकरी यांनी अग्निपथ (agnipath) योजनेपासून ते राष्ट्रपती निवडणुकीवर भाष्य केलं. तसेच त्यांच्या राजकीय महत्त्वकांक्षेवरही त्यांनी भाष्य केलं. मला प्रदूषित राजकारणात जायचं नाही. त्यावर मला बोलायचंही नाही. हा देश कधी प्रवचन आणि कीर्तनांनी सुधारला नाही आणि तमाशाने कधी बिघडला नाही, असं रोखठोक मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी देशात इलेक्ट्रॉनिक वाहनांची मागणी वाढली असल्याचं स्पष्ट केलं. तसेच आजकाल इलेक्ट्रिक वाहने वेटिंगवर मिळत आहे. त्यामुळे गाडी खरेदी करायचीच असेल तर इलेक्ट्रिक वाहनेच खरेदी करा, असं आवाहन त्यांनी केलं.

नितीन गडकरी यांनी टीव्ही9 ने ग्लोबल समिट व्हॉट इंडिया थिंक्स टुडेमध्ये हे विधान केलं. तुमच्या पक्षाच्यावतीने वातावरण खराब केलं जात आहे, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर ते बोलत होते. मी शुद्ध हवेत राहतो. मी प्रदूषित हवेत जात नाही. त्यामुळे प्रदूषित विधाने करत नाही. तुम्ही शुद्ध हवेत राहा, मीही राहतो. प्रदूषण करू नका. मला कोणी तरी सांगितलं दोन रेषा असतात. आपली रेषा मोठी करण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे दुसरी रेषा कमी करा किंवा दुसरा मार्ग म्हणजे आपली रेषा मोठी करा. मी नेहमी आपली रेषा मोठी करत असतो. पॉझिटिव्ह असतो. कोण काय बोलत आहे. कोण काय लिहित आहे. कोण काय पाहत आहे याकडे मी लक्ष देत नाही. ज्याचं त्याच्याकडे. आपलं काम करायचं ते करत राहा, असं गडकरी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अग्निपथ योजना सर्वात चांगली

यावेळी त्यांनी अग्निपथ योजना चांगली असल्याचं सांगितलं. केंद्र सरकारची अग्निपथ योजना चांगली आहे. फक्त ती समजून घेतली पाहिजे. लोकांना या योजनेची जशी माहिती मिळेल तसा विरोध संपुष्टात येईल, असं त्यांनी सांगितलं. भारतात लोकशाही आहे. जिथे लोकशाही असते. तिथे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी असतात. सत्ताधारी जेव्हाही काही करतात तेव्हा विरोधक त्याला नकार देतात. लोकशाहीत हे सगळं चालतं. जनतेच्या न्यायालयात जो आम आदमी असतो तोच शेवटचा निर्णय घेत असतो, असं त्यांनी सांगितलं.

पक्ष अंतिम निर्णय घेईल

यावेळी त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. सबका साथ, सबका विश्वास आणि सबका योगदान यावर मोदी सरकारचा विश्वास आहे. राष्ट्रपती निवडणुकीबाबत जेपी नड्डा आणि राजनाथ सिंह सर्वांशी चर्चा करत आहे. याबाबत संसदीय बोर्ड आणि पक्षाचा निर्णय अंतिम असेल, असंही त्यांनी सांगितलं.

समस्यांचं संधीत रुपांतर करा

आपण लोकशाहीत राहतो. लोकशाहीत समस्या कमी नसतात याचं मला नेहमीच स्मरण आहे. काही लोक समस्यांचं संधीत रुपांतर करतात. तर काही लोक संधीचंही समस्येत रुपांतर करतात. त्यामुळे अडचणी आल्यातर घाबरू नये, असं त्यांनी सांगितलं.