
TVK Rally Stampede : तमिळनाडूतील करूर इथं शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीवरून वाद निर्माण झाला आहे. तमिळनाडूमध्ये सत्ताधारी द्रमुक आणि ‘तमिळ वेत्री कळघम’ (टीव्हीके) यांच्यातील हा वाद मंगळवारी आणखी वाढला. राज्याचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन आपल्याविरुद्ध सूड उगवत असल्याचा आरोप अभिनेते विजय यांनी केला. तसंच या प्रकरणी सत्य बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे सरकारच्या अधिकृत प्रवक्त्या आणि आयएएस अधिकारी पी अमृता, आरोग्य सचिव सेंथिल कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) एस. डेव्हिडसन देवासिरवाथम यांनी मंगळवारी सचिवालयात पत्रकार परिषद घेऊन सभेत नियमांचं उल्लंघन झाल्याचं दर्शवणारे अनेक व्हिडीओ आणि फोटो दाखवले.
‘टीव्हीके’नं करूर इथं आयोजित केलेल्या सभेत कशा प्रकारे नियमांचं उल्लंघन करण्यात आलं, हे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. या सभेला अंदाजापेक्षा दुप्पट गर्दी जमली होती, त्यामुळे उपस्थितांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागलं, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. या पत्रकार परिषदेनंतर विजय यांनी एक व्हिडीओद्वारे आपल्या समर्थकांना संदेश दिला. “राज्य सरकारने आपल्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये, त्यांना जी काही कारवाई करायची आहे, ती आपल्यावर करावी”, असं भावनिक आवाहनही त्यांनी केलंय.
“करूर इथल्या सभेत घडलेल्या घटनेनं मला खूप मोठा धक्का बसला आहे. या घटनेचं राजकारण होऊ नये म्हणून मी सर्व खबरदारीचे उपाय केले आहेत. या घटनेचा सर्वांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे. पीडितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी अपेक्षा आहे. माझ्या पक्षाने काहीही चुकीचं केलेलं नाही. जवळपास पाच महिन्यांपासून मी प्रचार दौरे करत आहे. सत्य लवकरच समोर येईल. मीसुद्धा माणूसच आहे. मी त्याठिकाणी गेलो नाही, कारण पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची मला काळजी घ्यायची होती. आम्ही पाच जिल्ह्यांमध्ये प्रचार केला, मग करूरमध्येच हे का घडलं? हे कसं घडलं? लोकांना सत्य माहीत आहे आणि ते सर्वकाही पाहत आहेत”, असं विजय म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना उद्देशून ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला जर सूड घ्यायचा असेल तर मला काहीही करा, पण माझ्या समर्थकांना हात लावू नका. मी घरी असेन किंवा माझ्या ऑफिसमध्ये असेन. तुम्हाला जे करायचंय ते माझ्यासोबत करा. आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. तरीही पक्षाच्या नेत्यांची, सोशल मीडिया हँडलर्सची नावं एफआयआरमध्ये नोंदवली जात आहेत.”
सभेसाठी 30 हजार नागरिकांच्या उपस्थितीचा अंदाज असताना प्रत्यक्षात मात्र 60 हजारांवर नागरिक सभास्थळी उपस्थित होते. विजय हे लोकप्रिय अभिनेते असून त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. सभेच्या ठिकाणी विजय यांचं आगमन झाल्यानंतर भाषणाला सुरुवात होताच चेंगराचेंगरी झाली. यावेळी नागरिकांची पळापळ झाल्याने अनेकजण एकमेकांच्या अंगावर कोसळून बेशुद्ध पडले. जखमींना तत्काळ करूर सरकारी रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, या घटनेनंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.