घोषणा केलीय, पण उमेदवार कुठाय?, उत्तर प्रदेशात महिला उमेदवार मिळेना; काँग्रेसची अवस्था बिकट

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणुकीत 40 टक्के महिलांना तिकीट देण्याची अत्यंत महत्त्वाची घोषणा केली.

घोषणा केलीय, पण उमेदवार कुठाय?, उत्तर प्रदेशात महिला उमेदवार मिळेना; काँग्रेसची अवस्था बिकट
priyanka gandhi
| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 12:46 PM

लखनऊ: पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणुकीत 40 टक्के महिलांना तिकीट देण्याची अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. पण काँग्रेसची ही घोषणा हवेत विरते काय अशी चिन्हं आहेत. कारण उत्तर प्रदेशात काँग्रेसला महिला उमेदवारच मिळत नाहीयेत. त्यामुळे भाजपवर मात करण्यासाठी टाकलेला हा डाव काँग्रेसवरच उलटताना दिसत आहे.

उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवसात अधिसूचना जारी होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेसनेही ही निवडणूक मनावर घेतली असून त्यासाठी विशेष रणनीती आखली आहे. स्वत: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या उत्तर प्रदेश निवडणुकीत विशेष लक्ष घालत आहे. विशेष म्हणजे त्यांनी सर्व लक्ष महिला मतदारांकडे केंद्रीत केलं आहे. त्यामुळेच निवडणूक जाहीरनामा जाहीर करताना प्रियंका गांधी यांनी महिलांना 40 टक्के तिकीट देण्याची घोषणा केली होती. प्रियंका गांधी यांनी ही घोषणा केल्यानंतर इतर पक्ष बॅकफूटवर गेले होते. तर दुसरीकडे प्रियंका यांनी केलेली घोषणा काँग्रेससाठी अडचणीचीही ठरताना दिसत आहे. कारण काँग्रेसला राज्यात महिला उमेदवारच मिळताना दिसत नाहीये.

डोकेदुखी वाढली

मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या छाननी समितीकडे अर्ज आले आहेत. त्यात महिला उमेदवारांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण निवडणुकीत महिलांना 40 टक्के दिले नाही तर डोकेदुखी वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्यास इच्छुकांना सांगितलं होतं. त्यासाठी 11 हजार रुपये शुल्कही ठेवलं होतं. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचं दिसून येत आहे.

कुठे किती अर्ज आले?

अर्ज स्वीकारण्याची तारीख उलटून गेल्यानंतर काँग्रेसच्या छाननी समितीने अर्जांची पडताळणी केली. त्यात महिलांकडून अत्यंत कमी अर्ज आल्याचं दिसून येत आहे. लखनऊ सीटसाठी 110 अर्ज आले होते. त्यात केवळ 18 अर्ज महिलांचे होते. तर लखनऊ सेंट्रलसाठी 15 जणांनी अर्ज केले. त्यात सात महिलांचे अर्ज होते. मोहनलालगंजमध्ये सात पैकी तीन महिला, पूर्वमध्ये 11 पैकी 3 महिला, कँटसाठी 9 पैकी दोन महिला आणि उत्तरच्या जागेसाठी 9 पैकी दोन महिलांचे अर्ज आले होते. यावरून काँग्रेसचं तिकीट घेण्यास महिला इच्छुक नसल्याचंही बोललं जात असून त्यामुळे काँग्रेस नेत्यांची चिंता वाढली आहे.

काँग्रेस नेत्यांना शोध घ्यावा लागणार

सूत्रांच्या मते, महिलांना 40 टक्के महिलांना तिकीट देण्याचा मुद्दा काँग्रेससाठी अडचणीचा ठरत आहे. कारण काही दिवसांपूर्वी 7 जिल्ह्यातील अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात पुरुषांचीच संख्या सर्वाधिक होती. संपूर्ण उत्तर प्रदेशातून 1700हून अधिक अर्ज आले आहेत. त्यात महिलांची संख्या अधिक नाही. त्यामुळे प्रियंका गांधी यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काँग्रेसला आता महिला उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. नाही तर विरोधकांकडून हाच निवडणुकीचा मुद्दा केला जाऊ शकतो, असंही सांगितलं जात आहे.

 

संबंधित बातम्या:

Family Dispute | पती अपघातात गेला, सासू-सासऱ्यांनीच सुनेचं दुसरं लग्न लावलं आणि आता कोर्टातही खेचलं!

Marriage Age Of Women: आता 18 व्या नव्हे, 21 व्या वर्षी वाजवा रे वाजवा!, मुलीच्या लग्नाचे वय वाढवले; प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी

Vijay Diwas | 13 दिवसांच्या युद्धानंतर जनरल नियाजीने टेकवलेले गुडघे, पाकिस्तानवरील भारताच्या विजयाची गाथा