SIR प्रक्रियेवरून गदारोळ, कोणाच्या मर्जीने घेतला निर्णय? निवडणूक आयोगाचा मोठा दावा

Election Commission on SIR: केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आले. SIR प्रक्रियेवरून मोठा गदारोळ उठला आहे. त्याचवेळी याप्रकरणी कोणाच्या मर्जीने निर्णय घेण्यात आले, याविषयी निवडणूक आयोगाकडूनच मोठा दावा करण्यात आला आहे.

SIR प्रक्रियेवरून गदारोळ, कोणाच्या मर्जीने घेतला निर्णय? निवडणूक आयोगाचा मोठा दावा
निवडणूक आयोग सुखबीर सिंग संधू, विवेक जोशी, ज्ञानेश कुमार
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 23, 2026 | 1:00 PM

SIR प्रक्रियेवरून केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेद असल्याचा दावा करण्यात येत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरुद्ध दोन आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी तक्रारींचा पाढा वाचल्याचा दावा इंडियन एक्सप्रेसने केला आहे. या वृत्तानंतर देशभरात गदारोळ सुरू झाला आहे. विरोधी पक्षांच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे. गेल्या काही वर्षांपासून विरोधी पक्ष निवडणूक आयोगाच्या कारभारावर मोठा सवाल उपस्थित करत आहेत. हा वाद पेटलेला असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मोठा खुलासा केला आहे.

एकाच्या मर्जीने नाही, सर्वांच्या मंजूरीने निर्णय

विशेष सखोल उजळणी (SIR) प्रकरणी मनमानी केल्याचा आयोगाच्या इतर दोन सदस्यांनी तक्रार केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावर निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसआयआरसह सर्व निर्णय हे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन निवडणूक आयुक्तांच्या सहमतीनेच घेण्यात आले आहेत. त्यांच्या मंजूरीनेच हा निर्णय झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, एसआयआर प्रक्रियेदरम्यान अनेक मुद्यांवर दोन्ही निवडणूक आयुक्तांनी त्यांचा आक्षेप नोंदवला होता. त्यांनी गेल्या 10 महिन्यात 14 वेळा आक्षेप नोंदवला. निवडणूक आयोगाचे मोठे निर्णय हे मुख्य आयुक्त आणि इतर दोन आयुक्तांचे पॅनल घेते. सध्या ज्ञानेश कुमार मुख्य आयुक्त आहेत. तर सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी एसआयआर प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. दोघांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करून बहुमत नसताना एसआरआय प्रक्रियेसंबंधी निर्णय घेण्यात आले.

काँग्रेसची तिखट प्रतिक्रिया

या खुलाशानंतर काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. पार्टीचे महासचिव जयराम रमेश यांनी म्हटले की या नवीन दाव्यामुळे निवडणूक आयोगाची विश्वासहर्ता आणि निष्पक्षपणा पूर्णपणे संपला आहे. मुख्य आयुक्तांनी एसआयआर प्रक्रिया राबवताना इतरांना विश्वासात घेतले नाही. तीन सदस्यीय निवडणूक आयोग केवळ ज्ञानेश कुमार चालवत असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

ही अत्यंत चिंताजनक बाब

आम्ही आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगामुळे खूप भोगले आहे. त्याच निवडणूक आयोगाला मोडून काढण्याचे हे पाप आहे. हा अतिशय चिंताजनक विषय आहे. या संबंधी सरकारने तातडीने सर्व पक्षीय बैठक घ्यावी आणि चर्चा करावी. मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. निवडणूक आयोगात काम करणारेच लोक हे आरोप करत आहेत, ही चिंताजनक बाब आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us