अमेरिकेचा 25 टक्के टॅरिफचा निर्णय, भारताची पहिली प्रतिक्रिया

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेनं भारतावर 25 टक्के टेरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर आता भारताची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

अमेरिकेचा 25 टक्के टॅरिफचा निर्णय, भारताची पहिली प्रतिक्रिया
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 30, 2025 | 9:18 PM

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेनं भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. येत्या 1 ऑगस्टपासून नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू होईल असं ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेनं भारतावर 25 टक्के टॅरिफ लावल्यानंतर आता त्यावर भारताची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हटलं भारत सरकारने? 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी द्विपक्षीय व्यापाराबाबत जे वक्तव्य केलं आहे, त्या विधानाची सरकारने दखल घेतली आहे. त्याचे काय परिणाम होऊ शकतात? याचा अभ्यास सुरू आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून निष्पक्ष, संतुलित आणि दोन्ही देशांनाही फायदेशीर ठरेल असा द्विपक्षीय करार करण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत, आम्ही त्या उद्दिष्टासाठी वचनबद्ध आहोत.

सरकार आपले शेतकरी, उद्योजक आणि एमएसएमई क्षेत्राचे संरक्षण, कल्याण आणि प्रोत्साहनाला महत्त्व देते. त्यामुळे आपल्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पाऊले सरकारकडून उचलले जातील. जसं की युकेसोबतच्या करारांबाबत भारताचे धोरण राहिले आहे, असं भारत सरकारने म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच ट्विट 

अमेरिकेनं भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, याबाबत ट्रम्प यांनी एक ट्विट करून माहिती दिली आहे.  ‘भारत हा आपला मित्र देश असला तरी देखील आपण त्यांच्याशी तुलनेनं कमी व्यावसाय केला आहे.  कारण त्यांचे आयात शुल्क जगातील सर्वात जास्त आहे, आणि त्यांच्याकडे सर्वात कठीण आणि त्रासदायक गैर आर्थिक व्यापार अडथळे आहेत. तसेच त्यांनी त्यांचे बहुतांश लष्करी साहित्य रशियाकडून खरेदी केले आहे, आणि ते रशियाच्या ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत. चीनसह ज्यावेळी सर्वजण रशियाला युक्रेनमधील हिंसा थांबवण्यास सांगत आहेत, हे सर्व काही चांगले नाही, त्यामुळे भारताला एक ऑगस्टपासून 25 टक्के आयात शुल्क तसेच वरील कारणासाठी दंड आकारला जाईल, याकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद,’  असं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.