मांजरीच्या हल्ल्याकडे दुर्लक्ष करणं बेतलं जीवावर, तरुणाला गमवावा लागला जीव

मध्य प्रदेशात एका तरुणाचा मांजरीच्या नखांमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशात एका बालकावर झालेल्या हल्ल्याचीही माहिती समोर आली आहे.

मांजरीच्या हल्ल्याकडे दुर्लक्ष करणं बेतलं जीवावर, तरुणाला गमवावा लागला जीव
cat hit
| Updated on: Feb 21, 2025 | 8:15 PM

आपल्यापैकी अनेकांना घरात कुत्रे आणि मांजरी पाळण्याचा शौक असतो. तुमच्याही घरी जर एखादा पाळीव प्राणी असेल, तर तुम्ही काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचे आहे. बऱ्याचदा घरातील पाळवी कुत्रे किंवा मांजरी आपल्याला नखं मारतात, पण आपण त्याकडे किरकोळ समजून दुर्लक्ष करतो. मात्र मध्य प्रदेशातील शहडोलमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला यामुळे आपला जीव गमवावा लागला.

नेमकं प्रकरण काय?

मध्यप्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील अमलाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या ठिकाणी चीफ हाऊसमध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय दीपक कोलला उपचारासाठी एसईसीएल सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दीपकची तब्येत आणखी खालवली. त्यानंतर त्याला शहडोल मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले. मात्र तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दीपकच्या मृत्यूचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही. पण कुटुंबाने त्याच्या मृत्यूबद्दल एक धक्कादायक माहिती दिली आहे.

दीपकच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्या घरी नेहमी एक मांजर यायची. काही दिवसांपूर्वी त्या मांजरीने दीपकवर हल्ला केला. त्यावेळी तिची नखं त्याला लागली. यामुळे दीपकला गंभीर दुखापत झाली होती. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. या घटनेनंतर काही दिवसांनी दीपकची तब्येत अचानक बिघडली. यानंतर त्याच्यावर उपचार सुरु होते. पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. मांजराने नखांनी केलेल्या हल्ल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय कुटुंबाने व्यक्त केला आहे.

बरेलीतही लहान मुलावर पाळीव मांजरीचा हल्ला

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्येही अशीच एक घटना घडली होती. या ठिकाणी एका पाळीव मांजराने चार वर्षाच्या मुलावर हल्ला केला होता. त्यानंतर तो चिडचिड करू लागला. रागाने वस्तू फेकू लागला. यानंतर सिफानची प्रकृती अधिक बिघडली. त्याच्यासमोबर पाणी ठेवल्यावर त्यालाही तो घाबरु लागला. पंखा चालू केल्यानंतर रडू लागला. यामुळे त्याच्या कुटुंबाने त्याला डॉक्टरांकडे नेले. त्यावेळी त्याच्यात हायड्रोफोबिया आणि एरोफोबियाची लक्षणे आढळून आली. त्याला हायड्रोफोबिया आणि एरोफोबियाची लागण झाल्याचेही समोर आले. यानंतर डॉक्टरांनी त्या लहान मुलाच्या कुटुंबाकडे चौकशी केली असता त्या लहान बाळाला कोणत्याही पद्धतीचे लसीकरण करण्यात आले नव्हते. तसेच मांजराचेही कोणतेही लसीकरण झाले नव्हते.

या घटनेनंतर डॉक्टरांनी सर्वांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. कोणत्याही पाळीव किंवा भटक्या जनावराने चावा घेतल्यास किंवा नख मारल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर असे केले नाही, तर तुमच्या शरीरात संसर्ग पसरू शकतो. गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.