
Operation Sindoor: भारतीय सेनेनं पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान आणि पीओके येथील 9 ठिकाणी लक्ष्य साधत हवाई हल्ला केला. ज्यामध्ये जवळपास 100 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री हल्ला करत भारताने जैश-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांच्या दहशतवादी तळांवर आणि मुख्य कार्यालयांवर हवाई हल्ले केले. हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची कबुली पाकिस्तानने देखील दिली आहे. यामध्ये निर्दोष पाकिस्तानी नागरिकांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तानने दिली आहे. पण फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य करत हल्ला केल्याची माहिती भारताने नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान देखील संतापत असून भारताला याचं चोख प्रत्युत्तर देणार असं सांगितलं आहे. पाकिस्तानच्या प्रवक्त्याने योग्य वेळ आल्यानंतर भारताला उत्तर देणार असं सांगितलं आहे. प्रवक्ता म्हणाला, ‘आम्ही देखील भारताला उत्तर देणार पण वेळ, जागा आणि पद्धत आमची असेल…’ अशी पोकळ धमकी पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर भारताला दिली आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भारताने केलेल्या हल्ल्यात दहशतवादाचा मास्टरमाईंड मसूद अझहर याच्या कुटुंबियांचा देखील मृत्यू झाला आहे. ज्यामुळे पाकिस्तानात खळबळ माजली आहे.
मसूद अझहर याच्या कुटुंबातील जवळपास 14 जणांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबियांचा मृत्यू झाल्याची कबुली स्वतः मसूद अझहर याने देखील दिली आहे. संपूर्ण कुटुंब संपल्यानंतर मसूद अजहर अक्षरश: रडला. या हल्ल्यात मी सुद्धा मेलो असतो तर बरं झालं असतं, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या एअर स्ट्राईकमध्ये मसूद अझहरचा भाऊ रऊफ असगर ठार झाला आहे. या हल्ल्यात त्याच्या बहिणीचाही मृत्य झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच लष्कर-ए-तोएबचे 5 कमांडर ठार झाले आहेत. आता भारताच्या हिटलिस्टवर मसूद अजहर आहे.