
IISERs Third meeting of the Standing Committee: देशात नवीन शास्त्रज्ञ आणि संशोधक घडवण्यासाठी IISERs महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला. त्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेची (IISERs) तिसरी बैठक झाली. यावेळी मंत्री महोदयांनी देशातील सर्व 7 ही आयआयएसईआरच्या शैक्षणिक आणि संशोधन कार्याचा तसेच त्यांच्या भावी योजनांचा आढावा घेतला. देशातील प्रतिभावान युवकांची क्षमत उलगडण्यासाठी अधिक विद्यार्थी केंद्रीत दृष्टीकोन स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली. यावेळी मंत्री प्रधान यांनी परिणामाभिमुख संशोधनावर भर देण्यास सांगितले. या बैठकीला देशातील अनेक दिग्गज आणि मान्यवरांनी हजेरी लावली होती. हा ज्ञान प्रदानाचा एक सोहळा असल्याचे म्हटले जाते.
ही तर मुकुटातील रत्ने
प्रधान यांनी सांगितले की, IISERs या भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील मुकुटातील रत्नं आहेत. प्रत्येक IISERs या शैक्षणिक आणि संशोधनाची नवीन संस्कृती देशाता रुजवतील. देशातच नाही तर जागतिक वैज्ञानिक आव्हानांना सामोरं जाण्यास सक्षम शास्त्रज्ञ, नवीन संशोधक, उद्योजक घडवतील असा विश्वास केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला. जागतिक स्तरावर भारताची ओळख ज्ञानशक्ती अशी होईल असे सांगायलाही ते विसरले नाहीत. या बैठकीत शैक्षणिक आणि संशोधनात उत्कृष्ट ध्येय साधण्यासाठीच्या उपाय योजना, विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा, जागतिक दर्जाचे वैज्ञानिक शिक्षण आणि संशोधनाला चालणा देण्यासाठी मंथन झाले.
या मुद्यांवर झाले मंथन
1. शैक्षणिक लवचिकता
सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुक्ष आणि किचकट अशा वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यासाठी ते लवचिक आणि विद्यार्थी केंद्रीत करण्यावर या बैठकीत चर्चा झाली. शैक्षणिक दर्जा व संशोधनाभिमूख स्वरुप कायम ठेवत, निश्चित चौकटीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. प्रवेश आणि अभ्यासक्रमातून बाहेर पडण्याची मुभा, नियमीत सेमिस्टरऐवजी संशोधन, नवीन संशोधन, उद्योग आणि त्यावर आधारीत एका सेमिस्टरचे अनुभवाधारीत इंटर्नशिप करण्याचा पर्याय देण्यावर भर देण्यात आला. त्याआधारे शैक्षणिक श्रेयांक, क्रेडिट्स पॉईंट देण्यावर चर्चा झाली.
2. पीएचडी शिक्षणात बदल
IISERs च्या संचालकांनी यावेळी पीएचडी मधील उणिवा, आव्हाने आणि जागतिक स्तरावरील परिस्थिती, सर्वोत्तम पद्धती यांचा सखोल अभ्यास करण्याचा मनोदय व्यक्त केला. आता उद्योग क्षेत्रातील गरज आणि राष्ट्रीय प्राधान्यक्रमाआधारीत पीएचडी अभ्यासक्रमात आवश्यक सुधारणा सुचवल्या. त्याआधारे बदल करण्यात येणार आहे.
3. संशोधनाला मोठी चालना
IISERs ने समाजोपयोगी संशोधनावर भर देण्याविषयी केंद्रीय मंत्री प्रधान यांनी जोर दिला. लोकाभिमुख आणि परिणामकारक संशोधनावर त्यांनी भर दिला. आता प्रत्येक IISER मध्ये रिसर्च पार्क्स व इनक्युबेटर्स स्थापन्याचे निश्चित करण्यात आले. शैक्षणि संस्था, स्टार्टअप्स, उद्योगांचे संशोधन आणि विकास विभाग हे एकत्र येऊन नवीन संशोधनाला मोठी चालना देतील असे सूचवण्यात आले.
Chaired the 3rd Meeting of the Standing Committee of Indian Institutes of Science Education and Research.
Reviewed all 7 IISERs on their academic and research outputs and on their future plans. Suggested for more student-focused approaches for unleashing the full potential of… pic.twitter.com/mTTSEqACN9
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) January 13, 2026
इतकेच नाही तर यापुढे प्रत्येक IISER साठी एक विशिष्ट क्षेत्र (डोमेन) निश्चित करण्यात आले आहे. त्या-त्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून प्रत्येक IISER मध्ये उत्कृष्टता केंद्रे (Centres of Excellence – CoE) स्थापन केली जातील. ‘विकसित भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ यादृष्टीने ज्ञानाधारित अर्थव्यवस्था उभारण्यासाठी त्याचा वापर होईल आणि विविध क्षेत्रांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना मिळेल यावर चर्चा झाली.
या बैठकीला प्रा. अनिल डी. सहस्रबुद्धे (अध्यक्ष, कार्यकारी समिती, NAAC व अध्यक्ष, NETF), प्रा. एम. जगदीश कुमार (माजी अध्यक्ष, UGC), श्री चामू कृष्ण शास्त्री (अध्यक्ष, भारतीय भाषा समिती), सुश्री देबजानी घोष (डिस्टिंग्विश्ड फेलो, नीती आयोग), डॉ. विनीत जोशी (सचिव, उच्च शिक्षण विभाग), प्रा. अभय करंदीकर (सचिव, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग), डॉ. शेखर सी. मांडें (माजी सचिव, DSIR), प्रा. गोविंदन रंगराजन (संचालक, IISc बेंगळुरू), IISERs चे अध्यक्ष व संचालक, CSIR–CMERI, दुर्गापूरचे संचालक तसेच शिक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता.