
AL Falah University : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशनजवळ कारमध्ये मोठा स्फोट झाला. हा स्फोट साधासुधा नव्हता तर यामागे मोठा दहशतवादी कट होता, असे आता चौकशीतून समोर आले आहे. हा स्फोट झाल्यानंतर फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठ सर्वच तपास संस्थांच्या रडावर आले आहे. याच विद्यापीठातील अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांचा दिल्लीच्या स्फोटामागे हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सर्वच संशयित डॉक्टरांची सध्या चकौशी सुरू आहे. दुसरीकडे अल-फलाह विद्यापीठाने आमचा या घटनेशी काहीही संबंध नाही. विद्यापीठाला याबाबत कोणतीही कल्पना नव्हती असे सांगितले आहे. याच प्रकरणात तपास जसाजसा पुढे जातोय, तसे तसे अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. याच कारणामुळे तपासाच्या केंद्रस्थानी आलेल्या अल-फलाह विद्यापीठाबद्दल तसेच या विद्यापीठाचा आणि अटक करण्यात आलेल्या आरोपींचा नेमका काय संबंध आहे, हे समजून घेऊ या…
अल-फलाह विद्यापीठ हे हरियाणा राज्यातील फरीदाबाद जिल्ह्यात आहे. फरीदाबादमधील मुस्लीमबहुल धौज या गावात हे विद्यापीठ साधारण 76 एकर परिसरात पसरलेले आहे. दिल्ली स्फोटाचा तपास करताना याच विद्यापीठात डॉक्टरांना शिकवणारे काही प्राध्यापक तपास संस्थांच्या रडावर आले आहेत. कहरियाणा एसटीएफने बुधवारी (12 नोव्हेंबर) अल-फलाह विद्यापीठात जाऊन चौकशी केली. तसेच एनआयएनेही विद्यापीठात जाऊन आपला तपास केला आहे. अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांचा या विद्यापीठाशी संबंध आहे. या विद्यापीठाच्या संकेतस्थळानुसार हरियाणा सरकारने हरियाणा खासगी विद्यापीठ अधिनियमाअंतर्गत या विद्यापीठाला मान्यता दिलेली आहे. या विद्यापीठाची सुरुवात 1997 साली एका इंजिनिअरिंग कॉलेच्या रुपात झाली होती. त्यानंतर 2013 साली अल-फलाह इंजिनिअरिंग कॉलेजला विद्यापीठ अनुदान आयोगाने आपल्या मूल्यांकनाच्या प्रक्रियेत ए श्रेणी दिली होती. पुढे 2014 साली हरियाणा सरकारने या कॉलेजला विद्यापीठाचा दर्जा दिला. अल-फलाह वैद्यकीय महाविद्यालयही अल-फलाह विद्यापीठाअंतर्गत येते.
अनेक विश्लेषकांच्या मते अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी अल फलाह विद्यापीठ हे सुरुवातीच्या काळात अलिगड मुस्लीम विद्यापीठ तसेच जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठासाठी एक उत्तम पर्याय होते. दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठापासून फक्त 30 किमीच्या अंतरावर अल फलाह विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचा कारभार अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चालवला जातो. या ट्रस्टची स्थापना 1995 साली झाली होती. या ट्रस्टच्या अध्यक्षपदी जवाद अहमद सिद्दीकी हेआहेत. तर उपाध्यक्ष मुफ्ती अब्दुल्ला कासिमी, सचिव मोहम्मद वाजिद हे आहेत. अल फलाह विद्यापीठचे सध्याच रजिस्ट्रार प्राधाय्पक डॉ. महोम्मद परवेज हे आहेत. डॉ. भूपिंदर कौर आनंद या विद्यापीठाचे कुलपती आहेत. या विद्यापीठामार्फत अल फलाह स्कुल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, ब्राऊन हिल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अल फलाह स्कुल ऑफ एज्युकेशन अंड ट्रेनिंग या कॉलेजमार्फत शिक्षण दिले जाते.
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एका i20 कारमध्ये एक स्फोट झाला. या स्फोटात 12 लोकांचा मृत्यू झाला तर 30 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. स्फोट झालेली ही कार डॉ. मोहम्मद उमर नबी हा चालवत असल्याचा संशय आहे. हाच उमर अल फलाह विद्यापीठात सहायक प्राध्यापक होता. या स्फोटामध्ये उमरचे नाव समोर आले आहे. अल फलाह विद्यापीठाशी निगडित असलेल्या तीन डॉक्टरांसह इतर आठ लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण 2900 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली होती. या कारवाईच्या काही तासांनीच नंतर दिल्लीमध्ये कारमध्ये स्फोट झाला. अटक करण्यात आलेले डॉक्टर तसेच इतर संशयित हे जैस ए मोहम्मद आणि अंसार गझवत उल हिंद यांच्याशी जोडलेले असल्याचाही संशय आहे. त्यांचे हे नेटवर्क कास्मीर, हरियाणा, उत्तर प्रदेशपर्यंत पसरलेले असल्याचे बोलले जात आहे. अटक करणाऱ्यांमध्ये डॉ. मुजम्मिल गनई हा अल फलाह विद्यापीठात शिकवण्याचे काम करायचा.
दिल्ली स्फोटाचे प्रकरण समोर आल्यानंतर अल फलाह विद्यापीठाने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून विद्यापीठाचा याच्याशी काहीही संबंध नाही, असे स्पष्ट केलेले आहे. आमच्या विद्यापीठ परिसरात कोणत्याही प्रकारचे घातक रसायन किंवा स्फोटक ठेवण्यात आलेले नाही. लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटामध्ये आमचा काहीही संबंध नाही. आमच्या प्रयोगशाळा एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यंसाठीच वापरल्या जातात. अभ्यासक्रमाच्या गरजेनुसारच या प्रयोगशाळांचा वापर केला जातो. प्रयोगशाळेतील प्रत्येक काम हे नियमाच्या अधीन राहूनच केले जाते, असेही या विद्यापीठाने सांगितले आहे.
अल फलाह हा एक अरबी शब्द आहे. फलाह याचा अर्थ यश, संपन्नता, मुक्ती असा आहे. अल फलाह चॅरिटेबल स्ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी हे जवाद अहमद सिद्दीकी हे आहेत. जवाद यांनी 1995 साली या ट्रस्टची स्थापना केली होती. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्टनुसार त्याच काळात जवाद यांनी एक गुंतवणूक कंपनी चालू केली होती. मात्र या कंपनीत कथित घोटाळा झाल्यामुळे नंतर ते फरार झाले होते. जवाद हे या ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी तसेच अल फलाह विद्यापीठाचे चान्सलरही आहेत. या ट्रस्टच्या अंतर्गत सध्या अर्ध्या डझनपेक्षा जास्त शिक्षण संस्थाने कार्यरत आहेत. 1997 साली या ट्रस्टने अल फलाह अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. 2010साली या कॉलेजला नॅकतर्फे ए ग्रेड मिळाला. 2014 साली नंतर अल फलाह विद्यापीठाला मान्यता मिळाली. 2019 साली या विद्यापीठाने वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना केली.
सूत्रांच्या माहितीनुसर अल फलाह विद्यापीठातील वैद्यकीय महाविद्यालयात 40 पेक्षा जास्त डॉक्टर हे काश्मीरमधील आहेत. स्फोटकं आणि दिल्ली स्फोटाप्रकरणी अटक करण्यात आलेला डॉ. मुजम्मील हा गेल्या अनेक वर्षांपासून याच विद्यापीठाच्या आवारात डॉक्टरांसाठी असलेल्या घरांत राहात होता. तो गेल्या तीन वर्षांपासून जनरल फिजिशियन म्हणून काम करत होता. डॉ. मुजम्मील याचा जैश ए मोहम्मद या संघटनेशी संबंध असल्याचा दावा केला जातोय. अल फलाह विद्यापीठात सध्या 150 ते 200 विद्यार्थी असलेल्या पाच एमबीबीएसच्या बॅच चालू आहेत. दरम्यान, आता दिल्ली स्फोटाचे हे प्रकरण समोर आल्यानंतर नेमकं आमच्या भविष्याचे काय होणार? असा प्रश्न येथे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना पडला आहे.
तर दुसरीकडे पोलीस, एनआयए तसेच इतर तपास संस्था दिल्ली स्फोटाचा कसून तपास करत आहेत. सध्या अटकेत असलेल्या डॉक्टरांची कसून चौकशी केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या चौकशीत भविष्यात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विद्यापीठाचा स्फोटाशी अन्य काही संबंध आहे का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. दिल्लीच्या स्फोटानंतर संपूर्ण देशात मात्र तणावाचे वातावरण काय आहे.