काय आहे ऑपरेशन सिंदूर? पाकिस्तानात घुसून दहशतवादी ठिकाणं उडवली

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदुर अंतर्गत भारतीय सैन्य दलाने पहिली कारवाई केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेली पहिली कारवाई आहे. यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील एकूण ९ ठिकाणं लक्ष्य करण्यात आली. हे ऑपरेशन महिलांच्या सिंदुरला समर्पित आहे.

काय आहे ऑपरेशन सिंदूर? पाकिस्तानात घुसून दहशतवादी ठिकाणं उडवली
ऑपरेशन सिंदूर
| Updated on: May 07, 2025 | 4:15 AM

दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम भ्याड हल्ल्याची चीड भारतीयांच्या मनात गेली कित्येक दिवस घर करून होती. दोन आठवडे उलटून गेल्यानंतर कारवाई होत नसल्याने अस्वस्थता होती. पण केंद्र सरकार आणि सैन्य दल या भ्याड हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्याची जोरदार तयारी करत होतं. दहशवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता. भारताने या भ्याड हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल हे आधीच स्पष्ट केलं होतं. पण कधी आणि केव्हा हे मात्र निश्चित नव्हतं. अखेर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. या ऑपरेशन अंतर्गत एकूण ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला गेला. ही कारवाई योग्य रणनितीनुसार पार पडली. या हल्ल्यात एकही पाकिस्तानी सैन्य तळ नव्हतं, पण दहशतवादी ठिकाणांवर वेचून हल्ला केला आहे. भारताने दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. या प्रत्युत्तरातून भारताने स्पष्ट संदेश दिला की, दहशतवाद्यांना सोडणार नाहीत. भारत फक्त आता इशारा देत नाही तर कारवाई देखील करतो हा संदेश संपूर्ण जगाला गेला आहे.

‘मिशन सिंदूर’ नाव का?

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा महिलांना सोडून त्यांच्या पतींना मारलं होतं.  महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या पतींना गोळ्या झाडल्या होत्या. त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी या मिशनचं नाव ‘मिशन सिंदूर’ ठेवलं गेलं. भारतीय सैन्य दलाने या मिशन अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांना धडा शिकवला आहे. दहशतवाद्यांनी यापुढे कोणत्याही महिलेचं सिंदूर पुसण्याची हिंमत केली तर ते युद्धासारखं मानलं जाईल हा स्पष्ट संदेश या प्रत्युत्तरातून दिला आहे.

कायद्याच्या कक्षेत कारवाई

भारताने आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कक्षेत कारवाई केली. या कारवाईचा कोणत्याही नागरी स्थानावर किंवा सामन्य नागरिकांवर परिणाम झाला नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हे स्पष्ट केलं की, ही कारवाई फक्त दहशतवादाविरुद्ध होती. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला नाही. पण पाकिस्तानमध्ये या हल्ल्यानंतर खळबळ उडाली आहे. अनेक दहशतवादी अड्डे रिकामी करण्यात आले आहेत. तसेच सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारताने २०१६ मध्ये सर्जिकल स्ट्राईक आणि २०१८ बालाकोट एअरस्ट्राईक केला होता. भारताने पाकिस्तानच्या भूमीवर केलेली ही तिसरी कारवाई आहे.