
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या संघटनेबाबत सर्वांना माहिती आहे. ही एक हिंदू राष्ट्रवादी, सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना आहे. या संघटनेची स्थापना 1925 मध्ये डॉ. हेडगेवार यांनी नागपूर येथे केली होती. आता या संघटनेचा मोठा विस्तार झाला असून ती विविध क्षेत्रात कार्यरत आहे. आज लखनऊ येथील दिव्य गीता प्रेरणा उत्सवात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. यावेळी त्यांना आरएसएसला फंडिंग कुठून मिळते असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना योगी आदित्यनाथ नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
आरएसएसला फंडिंग कुठून मिळते या प्रश्वावर बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘लोक विचारतात की आरएसएसला निधी कुठून मिळतो. मी त्यांना सांगू इच्छितो की आरएसएसला कोणत्याही परदेशी देशाकडून किंवा बाह्य संघटनेकडून निधी मिळत नाही. आरएसएस ही संघटना समाजाच्या सहकार्याने, लोकांच्या निस्वार्थी भावनेने आणि राष्ट्रप्रेमाने चालवली जाते. आरएसएस गेल्या 100 वर्षांपासून राष्ट्र प्रथम या भावनेने देशाची सेवा करत आहे. संघाने सेवेच्या नावाखाली कधीही तडजोड केलेली नाही. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पुढे बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्रीमद् भगवद्गीतेतील महत्त्वावर चर्चा केली. CM आदित्यनाथ म्हणाले की, गीतेतील 700 श्लोक हे सनातन धर्मासाठी जीवनाचा मंत्र आहेत. धर्म ही केवळ उपासनेची पद्धत नाही, तर जगण्याची कला आहे. गीतेतून आपल्याला निस्वार्थ कर्माची भावना शिकवली जाते. भारताने जगाला जगा आणि जगू द्या आणि वसुधैव कुटुंबकमचा संदेश दिला आहे. जिथे धर्म आणि कर्तव्य आहे, तिथे विजय निश्चित आहे. धर्माचे पालन करताना मृत्यू स्वीकारणे हे श्रेष्ठ मानले जाते.’
या कार्यक्रमात बोलताना स्वामी ज्ञानानंद म्हणाले की, आजच्या काळात गीतेच्या शिकवणीची जगाला आवश्यकता आहे. स्मार्ट शहरांची संकल्पना तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा लोक हुशार आणि संवेदनशील असतील. यासाठी गीतेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. गीतेचा संदेश प्रत्येक घरात पोहोचला पाहिजे, त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणात गीतेतील मूल्यांचा समावेश केला पाहिजे.