मिशेल मामा कोण आहे तेही समोर येऊ द्या : पंतप्रधान मोदी

मिशेल मामा कोण आहे तेही समोर येऊ द्या : पंतप्रधान मोदी

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात जवळपास एक हजार कोटींच्या योजनांचा शुभारंभ केलाय. शिवाय सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नव्या रेल्वेमार्गाची घोषणाही त्यांनी केली. ज्याचं आम्ही भूमीपूजन करतो, त्याचं उद्घाटनही करतो, असं म्हणत मोदींनी गरीबांसाठी घरांच्या कामाचं भूमीपूजनही केलं.

राफेल लढाऊ विमान प्रकरणी भाजपवर टीका करणाऱ्या काँग्रेसचा मोदींनी जोरदार समाचार घेतलाय. ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी अटक केलेला दलाल ख्रिश्चन मिशेल याचा राफेल विमान व्यवहारात सहभाग होता का? त्याच्या कमिशनमुळे तर फ्रान्ससोबतचा व्यवहार थांबला नव्हता ना? असा सवाल मोदींनी केलाय.

“वृत्तपत्रात वाचलं, की भारताने परदेशातून हेलीकॉप्टर घोटाळ्यात अटक करुन आणलेला मिशेल फक्त हेलीकॉप्टर व्यवहारात मध्यस्थी नव्हता. तर अगोदरच्या सरकारने फ्रान्ससोबत लढाऊ विमान खरेदी करण्याचा जो व्यवहार केला, त्यातही त्याची भूमिका होती,” असं मोदी म्हणाले. वाचा‘ही’ घोषणा करताच सोलापुरात ‘मोदी, मोदी’च्या घोषणा

“मिशेल मामाच्या व्यवहारामुळे तर फ्रान्ससोबतचा तो व्यवहार थांबला नव्हता ना? या सर्व प्रश्नांची उत्तरं तपास यंत्रणा तर शोधत आहेतच, पण जनतेलाही याचं उत्तर हवंय. मध्यस्थींविषयी सहानुभूती ठेवणारे आणि राष्ट्रीय सुरक्षेशी छेडछाड करणारे जे आहेत, त्यांना धडा शिकवायलाच हवा,” असा इशारा मोदींनी दिला.

“कमिशनखोरांचे सर्व मित्र मिळून चौकीदाराला भीती दाखवण्याचं स्वप्न पाहत आहेत. पण यांच्या हाती निराशाच लागणार आहे, कारण, हा चौकीदार ना झोपतो, ना कुणाला घाबरतो. या चौकीदाराला तुमच्याकडून बळ मिळतंय. त्यांनी मला शिव्या देऊ द्या, वारंवार खोटं बोलू द्या, पण हे सफाई अभियान चालूच राहिल,” असंही मोदी म्हणाले.

कोण आहे मिशेल?

व्हीव्हीआयपी चॉपर म्हणजेच ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा म्हणून परिचित असणाऱ्या गैरव्यवहारातील आरोपी ख्रिश्चन मिशेलला भारतीय तपास यंत्रणांनी दुबईतून अटक केली. मिशेल हा ब्रिटनचा रहिवासी आहे. सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ईडीने दुबईत जाऊन मिशेलच्या मुसक्या आवळल्या. सध्या त्याची भारतीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे.

काय आहे ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा?

फेब्रुवारी 2010 मध्ये यूपीए सरकारने 12 व्हीव्हीआयपी चॉपर खरेदी करण्यासाठी इंग्लंडच्या ऑगस्ट वेस्टलँड कंपनीशी 3600 कोटींचा करार केला. पण यामध्ये नंतर घोटाळा झाल्याचे आरोप करण्यात आले. 2013 साली इटलीमध्ये सर्वात अगोदर या प्रकरणाची चौकशी सुरु झाली. कारण, ज्या इंग्लंडच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीसोबत हा करार झाला होता, त्या कंपनीने इटलीतील फिनमेक्सिनिका या इटलीतील कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या कंपनीला कंत्राट दिलं. हे कंत्राट देण्यासाठी कोट्यवधींची लाच दिल्याचा आरोप झाला.

या आरोपांनंतर इटलीतील तपास यंत्रणांनी चौकशी सुरु केली आणि फिनमेक्सिनिकाचा प्रमुख गोसेपी ओर्सी आणि ऑगस्टा वेस्टलँडचा प्रमुख ब्रुनो स्पॅग्नोलिन यांना अटक केली. भारतासोबत व्यवहार करताना आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा या दोघांवर इटलीत ठपका ठेवण्यात आला.

तत्कालीन संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आणि 1 जानेवारी 2014 म्हणजेच भाजप सत्तेत येण्याच्या काही महिने अगोदरच हे कंत्राट रद्द करण्यात आलं. सीबीआय या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून कंत्राटासाठी लाच दिली गेली असं समोर आल्याचं तेव्हा खुद्द ए. के. अँटोनी यांनी सांगितलं होतं.

2014 मध्ये इटालीयन कोर्टाकडून चौकशी सुरु असतानाच, तत्कालीन भारतीय वायू सेनेचे प्रमुख एस. पी. त्यागी यांचं नाव घोटाळ्यात समोर आलं. ऑगस्टा वेस्टलँडसोबत कंत्राट करण्यासाठी फिनमेक्सिनिकाने एस. पी. त्यागी यांना लाच दिली, असं इटालीयन कोर्टाने सांगितलं. पण नंतर 2015 मध्ये इटालीयन कोर्टानेच एस. पी. त्यागी यांचा सहभाग नसल्याचं स्पष्ट केलं. त्यागी सध्या जामिनावर बाहेर असून त्यांची चौकशी सुरु आहे.

या प्रकरणात मध्यस्थी करणारे तीन जण होते, त्यापैकीच ख्रिश्चन मिशेल हा एक आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI