सोनम वांगचूक यांनी उपोषण का सोडलं? पहिल्यांदाच खरं कारण समोर, केला सर्वात मोठा खुलासा

सोनम वांगचूक यांनी अखेर आपलं उपोषण सोडलं आहे, उपोषण का सोडलं? याबाबत त्यांनी आता मोठा खुलासा केला आहे. त्यांनी या संदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सोनम वांगचूक यांनी उपोषण का सोडलं? पहिल्यांदाच खरं कारण समोर, केला सर्वात मोठा खुलासा
sonam wangchuk
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 24, 2026 | 5:00 PM

नीट पेपर फुटीवरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या एक महिन्यापासून कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीमधील जतंर मतंरवर आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचूक देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत, त्यांनी तब्बल 21 दिवस जंतर मंतरवर आमरण उपोष केलं, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान 23 जुलै रोजी उपोषणाच्या 26 व्या दिवशी वांगचूक यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. सोनम वांगचूक यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, याच रुग्णालयात मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते ज्यूस पिऊन सोनम वांगचूक यांनी आपलं उपोषण मागे घेतलं, दरम्यान सोनम वांगचूक यांनी घेतलेल्या या भूमिकेवरून काही जणांकडून त्यांच्यावर टीका होत आहे, यावर आता त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उपोषण मागे घेतल्यानंतर सोनम वांगचूक यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे.

नेमकं काय म्हणाले सोनम वांगचूक

तुम्ही मला आता विचाराल की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं? पहिली गोष्ट मला यावर सरकार कोणतंही आश्वासन देऊ शकलेलं नाहीये, मात्र संसदेमध्ये यावर चर्चा होईल, माझ्याकडे दोनच मार्ग होते, एक तर उपोषण सोडून द्यावं किंवा उपोषण पुढेही सुरूच ठेवावं. परंतु मला हजारो लोकांनी सांगितलं की तुमचा जीव महत्त्वाचा आहे. तुम्हाला पुढच्या काळात देखील संघर्ष करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला जिवंत राहावं लागेल. मी हे देखील मान्य करणार नाही की या आंदोलनातून आमच्या हाती काहीच लागलं नाही. माझं डोकं वेगळ्या पद्धतीने विचार करत आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर आम्हाला किंवा विद्यार्थ्यांना नुकसान होणार नाही, तर त्यांचं नुकसान होईल. जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असता तर सरकारचं नुकसान टळलं असतं, असं यावेळी वांगचूक यांनी म्हटलं आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांवर कोणतीही केस झाली नाही पाहिजे, हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं, आम्ही लडाखमध्ये पाहिलं आहे, एकदा एफआयआर झाली की आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्यामुळे सरकारने मला असं आश्वासन दिलं आहे की, या मुलांवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही, तसेच नीट पेपर प्रकरणात ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यांच्या कुटुंबाला योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल, असं सोनम वांगचूक यांनी म्हटलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us