
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ने चोख प्रत्युत्तर दिलं. या ऑपरेशन अंतर्गत भारतीय सैन्याने हवाई हल्ले करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यात किमान 15 क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. यासाठी भारताने खास ब्रह्मोस मिसाइल्सची निवड केली होती. ब्रह्मोस हे एक सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल आहे, जे ध्वनीच्या तिप्पट वेगाने (मॅक 3) उडते. भारत आणि रशियाने संयुक्तपणे या मिसाइलची रचना केली आहे. ब्रह्मोस हे जमीन, समुद्र आणि हवेतूनही लाँच करता येतं. त्याची रेंज 290-450 किलोमीटर आहे. यात 200-300 किलोग्रॅम विस्फोटक असतात, ज्यामुळे ते मोठ्या तळांना नष्ट करण्यास सक्षम ठरतात.
6 मे ते 10 मे 2025 दरम्यान ऑपरेशन सिंदूर दोन टप्प्यांमध्ये राबवलं गेलं होतं. यातील पहिला टप्पा 7 मे रोजी आणि दुसरा टप्पा 10 मे रोजी राबविण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यात भारताने जवळपास 15 ब्रह्मोस मिसाइल्स डागले होते. यात पाकिस्तानचे 11 एअरबेस उद्ध्वस्त झाले होते. यात रफिकी, मुरीद, नूर खान आणि चुनियार यांचा समावेश होता. या हल्ल्यांनी पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम आणि कमांड कंट्रोल सिस्टिम पूर्णपणे ठप्प केली होती.
भारताने डमी म्हणजे बनावट लढाऊ विमान पाठवून पाकिस्तानला आधी गोंधळात पाडलं. त्यानंतर ब्रह्मोस मिसाइल्स लाँच करण्यात आले. याविषयी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं की, ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस मिसाइलची ताकद पाहिलीच असेल, जर पाहिली नसेल तर पाकिस्तानला विचारा.
ब्रह्मोस हे जमीन, समुद्र (जहाजं आणि पाणबुड्या) आणि हवेतून (विमान, सुखोई 30 एमकेआय) लाँच केलं जाऊ शकतं. प्रगत नेव्हिगेशन आणि मार्गदर्शन प्रणालीसह ते लक्ष्यावर अचूकपणे वार करतं. हे मिसाइल दिवसा, रात्री आणि कोणत्याही हवामानात काम करू शकतं. त्याचप्रमाणे एकदा ते लाँच केल्यानंतर ऑपरेटरकडून सतत त्याच्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता नसते.
ब्रह्मोसचा वापर करून भारताने आपल्या लष्करी ताकदीचा आणि दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचा संदेश दिला. हा संदेश केवळ पाकिस्तानपर्यंतच नाही तर आंतरराष्ट्रीय समुदायापर्यंत पोहोचला आहे. व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि सौदी अरेबियासारख्या अनेक देशांनी ब्रह्मोस खरेदी करण्यास रस दाखवल्याचं कळतंय.