Thalapathy Vijay: थलपती विजय यांना मोठा धक्का, थेट मुख्यमंत्रिपद जाणार? हायकोर्टात नेमकं काय घडलं?

Thalapathy Vijay: या प्रकरणामुळे थलपती विजय यांच्या राजकीय भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मद्रास हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

Thalapathy Vijay: थलपती विजय यांना मोठा धक्का, थेट मुख्यमंत्रिपद जाणार? हायकोर्टात नेमकं काय घडलं?
थलपती विजय
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 28, 2026 | 9:41 AM

अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारे तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय सध्या त्यांच्या निवडणुकीतील यशाला आव्हान देणाऱ्या याचिकेमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणात विजय यांनी मद्रास हायकोर्टात महत्त्वाची बाजू मांडली आहे. मात्र, केवळ प्रचारात लहान मुलांचा सहभाग असल्याच्या आरोपामुळे निवडणूक रद्द करता येणार नाही, असा दावा विजय यांच्या वतीने करण्यात आला आहे.

नेमका वाद काय?

तिरुचिरापल्ली पूर्व विधानसभा मतदारसंघातून विजय यांनी डीएमकेचे उमेदवार एस. इनिगो इरुदयराज यांचा 27,416 मतांनी पराभव केला होता. मात्र, इरुदयराज यांनी विजय यांच्या निवडणूक विजयाला मद्रास हायकोर्टात आव्हान दिलं आहे. त्यांच्या याचिकेत निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचसोबत निवडणूक खर्च, परदेशी निधी आणि धार्मिक स्थळांवर प्रचार केल्याची तक्रारही त्यांनी केली आहे.

याचिकाकर्त्याने निवडणूक आयोगाच्या 5 फेब्रुवारी 2024 रोजीच्या निर्देशाचा आधार घेतला आहे. या निर्देशानुसार राजकीय पक्ष आणि उमेदवारांना निवडणुकीशी संबंधित प्रचारात लहान मुलांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली होती. या नियमाचं उल्लंघन झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

विजय यांनी मांडली बाजू

थलपती विजय यांनी एस. इनिगो इरुदयराज यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. समजा प्रचारात लहान मुलांचा वापर झाल्याचा आरोप खरा मानला तरी त्यामुळे थेट निवडणूक रद्द करण्याचा कायदेशीर आधार तयार होत नाही, असं ते म्हणाले. याशिवाय, याचिकेत मुलांच्या कथित सहभागामुळे नेमके किती मतदार प्रभावित झाले किंवा त्याचा निकालावर किती परिणाम झाला, हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही, असा युक्तिवाद विजय यांच्या वतीने करण्यात आला आहे. केवळ मतदार भावनिकदृष्ट्या प्रभावित झाल्याचा दावा पुरेसा नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

विजय यांची आमदारकी जाणार?

मद्रास हायकोर्टाने या प्रकरणात अद्याप अंतिम निर्णय दिलेला नाही. त्यामुळे सध्या तरी विजय यांची आमदारकी रद्द झालेली नाही. विजय यांनी निवडणूक याचिका फेटाळण्याची मागणी केली असून त्यांच्या अर्जावर 31 ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. विजय यांनी निवडणूक खर्च आणि कथित परदेशी निधीच्या आरोपांवरही स्पष्टीकरण दिलं आहे. याचिकेत खर्चाचे केवळ अंदाजे आकडे दिले असून पैसा कोणी, कधी आणि कशासाठी खर्च केला याची ठोस माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला. धार्मिक स्थळांवर प्रचार केल्याच्या आरोपांवरही त्यांनी आक्षेप घेतला असून, केवळ धार्मिक स्थळी जाणं किंवा प्रार्थना करणं म्हणजे धार्मिक आधारावर मत मागणं ठरत नाही, असं त्यांनी कोर्टात म्हटलं आहे.

त्यामुळे आता मद्रास हायकोर्ट 31 ऑगस्टच्या सुनावणीत काय भूमिका घेतं, याकडे विजय यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us