बोलता येत नसेल तर..; राहुल गांधींच्या ‘माइक ऑफ’च्या आरोपांवर स्मृती इराणींची रोखठोक प्रतिक्रिया

सत्ता संमेलनात बोलताना भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी त्यांच्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. "मला वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. मी नेहमीच आयुष्याकडे एक संधी म्हणून पाहिलं आहे", असं त्या म्हणाल्या.

बोलता येत नसेल तर..; राहुल गांधींच्या माइक ऑफच्या आरोपांवर स्मृती इराणींची रोखठोक प्रतिक्रिया
Smriti Irani
Image Credit source: Tv9
| Updated on: Mar 24, 2026 | 12:11 PM

‘टीव्ही 9 नेटवर्क’च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट 2026’चा आज (मंगळवार, 24 मार्च) दुसरा दिवस असून भाजप नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हजेरी लावली. सत्ता संमेलनात त्यांनी राहुल गांधी यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाचं बेधडक उत्तर दिलं. “तुम्हाला बोलताच येत नसेल, तर इतरांना दोष देऊ नका”, असं त्या राहुल गांधींनी लोकसभेत मायक्रोफोन बंद केल्याच्या घटनेसंदर्भात म्हणाल्या. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर स्मृती इराणींनी प्रतिक्रिया दिली. “तुमचा माइक चालू आहे. इथे सर्वांचे माइक चालू आहेत. बोलवा त्यांना, हा माइक तर चालू आहे. जनतेलाही बोलवा आणि त्यांनाही बोलावून सांगा की हा माइक तर चालू आहे, तर आता तुम्ही बोला”, अशा शब्दांत स्मृती इराणींनी राहुल गांधींना उत्तर दिलं.

राहुल गांधींच्या आरोपांवर प्रतिक्रिया

संसदेत माइक बंद केल्याच्या आरोपावर माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, “तुम्हाला नियमानुसार बोलायचं आहे. तुम्हाला नियम मोडायचे आहेत. तुम्ही विचारत आहात की तुम्हाला नियम का मोडू दिलं जात नाही? संसदेत अध्यक्षांना एका प्रणालीनुसार सभागृह चालवावं लागतं. पण जर त्यांना आवाज वाढवायचा असेल, तर त्यांनी बोलावं. जेव्हा केंद्रात त्यांचं सरकार 10 वर्षे सत्तेत होतं, तेव्हा मी खासदारसुद्धा नव्हते. मी 2010-11 मध्ये राज्यसभेत गेले, पण त्याआधी मी एका सामान्य भाजप कार्यकर्त्यासारखी बोलत होते. तेव्हाही ते ऐकत होते. आम्ही विरोधी पक्षात असतानाही ते ऐकत होते. जेव्हा आम्ही 10 वर्षे विरोधी पक्षात होतो, तेव्हा आम्ही म्हणत होतो की जनता ऐकतेय. जर त्यांना तिथे काही अडचण वाटत असेल तर टीव्ही 9 मध्ये त्यासाठी एक व्यवस्था आहे. तुम्ही इथे येऊन बोलू शकता. जनतेलाही प्रश्न विचारू द्या.”

“वेळ संपल्यावर आम्हालाही बोलता येत नव्हतं”

“मला असं वाटतं की तुम्ही बोलू शकता, परंतु जर तुम्हाला बोलताच येत नसेल तर संसदेत त्याबद्दल आरोप करू नका. मी केंद्रात मंत्रीपद भूषवलं आणि 3 वेळा खासदार राहिले. जर अध्यक्ष सांगत असतील की तुम्ही बोलू नका, वेळ संपत आली आहे, तर आम्हीसुद्धा तिथे बोलू शकत नव्हते. तेव्हा आम्ही कुठे बाहेर येऊन असे आरोप करत होतो, वाद घालत होतो. ते संसद आहे, त्यांच्या घराचं अंगण नाही. एका प्रणालीअंतर्गत तुम्हाला बोलायचं असतं. तो संविधानाच्या व्यवस्थेचा एक भाग आहे”, असं रोखठोक प्रत्युत्तर स्मृती इराणी यांनी राहुल गांधींच्या आरोपांवर दिलं आहे.

सत्ता संमेलनात स्मृती इराणी त्यांच्या संघर्षाबद्दलही व्यक्त झाल्या. “मला वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करायला मिळालं, हे माझं सुदैव आहे. मी आयुष्याकडे नेहमीच एक संधी म्हणून पाहत आले. मला ज्या संधी मिळाल्या, त्या अनेकांना मिळाल्या नाहीत, असं मला वाटतं. मला असं वाटतं की जेव्हा कोणी यश मिळवतं, तेव्हा त्याच्या मनात भीतीसुद्धा निर्माण होते. पण ती भीती माणसाला मर्यादित करते. मला त्याची भीती वाटत नाही. मी संघर्षापासून कधीच दूर पळाले नाही. यश हे संघर्षातूनच येतं”, असं त्या पुढे म्हणाल्या.

Follow Us