
Supreme Court : सामान्य जनतेच्या न्याय आणि हक्कासाठी वकील न्यायालयात आपली बाजू मांडत असतो. आपल्या वकिली करणाऱ्यांची संख्या बरीच आहे. पण यात महिला वकिलांची संख्या फारच कमी आहे. ज्या महिला वकिली करतात त्यांनादेखील अनेक समस्यांना समोरे जावे लागते. सध्या अशीच एक समस्या चर्चेचा विषय ठरत आहे. सर्वोच्च न्यायालयातील महिला वकिलांनी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आणला आहे. या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली असून एक महत्त्वाची मागणी केली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून महिला वकिलांनी न्यायालय, बार काऊन्सिलमध्ये बसण्यासाठी जागा नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही हालअपेष्टा सोसल्या आहेत. आता महिला वकिलांची संख्या वाढत आहे. महिला वकिलांना कुठेही झाडाखाली बसून आपले काम करावे लागते. त्यामुळे महिला वकिलांना देशभरातील न्यायालयांत, बार असोशिएशन्समध्ये प्रोफेशनल चेम्बर किंवा कक्ष द्यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. देशातील काही वरिष्ठ महिला वकील यात याचिकाकर्त्या आहेत. आता न्यायालयानेही या मागणीची दखल घेत नोटीस जारी केल असून प्रतीवादी पक्षाला उत्तर मागितले आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून सुप्रीम कोर्ट बार असोशिएशनच्या चेम्बर वेटिंग लिस्टमध्ये आमचा समावेश असूनही आम्हाला आमच्या कामांसाठी योग्य जागा मिळत नाहीये. भविष्यात तयार केल्या जाणाऱ्या चेंबर्समध्ये महिला वकिलांना प्राधान्य द्यावे. महिलांसाठी चेंबर्स आरक्षित ठेवावेत, अशीही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. अॅड. प्रेरणा यांनी महिला वकिलांच्या या समस्यांबाबत सविस्तरपणे सांगितले आहे. अनेक वर्षांपासून आम्ही प्रॅक्टिस करत आहोत. पण तरीदेखील आमच्या कार्यालयीन कामासाठी आम्हाला चांगली जागा मिळालेली नाही. कन्सल्टेशन रुम नेहमीच बुक असते. लोक दिवसभर त्याच रुममध्ये बसून असतात. देशातील अनेक न्यायालयांत महिला वकिलांना झाडाखाली बसूनच आल्या क्लायन्टशी चर्चा करावी लागते, असे अॅड. प्रेरणा यांनी सांगितले आहे.
तसेच आम्हाला आरक्षण नको आहे. पण सन्मानजनक जागा मिळाली पाहिजे, असेही मत याचिकाकर्त्या महिला वकिलांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता या याचिकेवर नेमका काय निकाल दिला जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.