Wrestler Protest : कुस्तीपटू कामावर परतले, मात्र लढा कायम सुरू राहणार, साक्षी मलिकने केले स्पष्ट

ऑलिम्पिक पदक विजेते साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया हे त्यांच्या रेल्वेच्या नोकरीवर पुन्हा रुजू झाले आहेत. मात्र आपली लढाई सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले

Wrestler Protest : कुस्तीपटू कामावर परतले, मात्र लढा कायम सुरू राहणार, साक्षी मलिकने केले स्पष्ट
| Updated on: Jun 05, 2023 | 3:46 PM

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात देशातील कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. दरम्यान भारताचे स्टार कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshi Malik) , विनेश फोगट(Vinesh phogat) , बजरंग पुनिया (Bajrang Punia) हे रेल्वेतील त्यांच्या नोकरीवर परतले आहेत.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारताचे स्टार कुस्तीपटू जंतरमंतरवर बराच काळ आंदोलन करत होते, मात्र २८ मे रोजी त्यांना तेथून हटवण्यात आले. त्यानंतर साक्षी, बजरंग आणि विनेश हे तिघेही नोकरीवर परतले आहेत. मात्र, असे असले तरीही त्यांचा विरोध आणि आंदोलन कायम राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर रेल्वे मुख्यालयाच्या नोंदीनुसार, हरिद्वारमधील हाय ड्रामानंतर दुसऱ्याच दिवशी 31 मे रोजी साक्षी मलिक ही बडोदा हाउस ऑफिसमध्ये तिच्या कामावर परतली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, साक्षीने नोकरीत रुजू होताच रेल्वे इंटर डिव्हिजन चॅम्पियनशिपलाही मान्यता दिली आहे. साक्षी, विनेश आणि बजरंग हे ओएसडी स्पोर्ट्स पदावर कार्यरत आहेत.

कुस्तीपटूंची लढाई सुरूच

आपण सत्याग्रहाच्या लढाईतून मागे हटले नसल्याचेही साक्षीने ट्विट करून स्पष्ट केले आहे. रेल्वेतील जबाबदारी पार पाडण्यासोबतच त्यांचा लढाही सुरूच राहणार आहे. ऑलिम्पिक पदक विजेता म्हणाली की, त्यांच्यापैकी कोणीही मागे हटणार नाही आणि न्यायाच्या लढ्यात मागे हटणार नाही. न्याय मिळेपर्यंत त्यांचा लढा सुरूच राहणार आहे, असेही साक्षीने स्पष्ट केले.

 

बजरंग पुनियानेही स्पष्ट केली भूमिका

दुसरीकडे स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आंदोलन मागे घेतल्याचे वृत्त ही एक अफवा असल्याचे सांगितले. हानी पोहोचवण्यासाठी हे वृत्त पसरवले जात आहे. ते मागे हटले नसून त्यांनी आंदोलनही मागे घेतले नाही, असे त्याने स्पष्ट केले. महिला कुस्तीपटूंनी एफआयआर मागे घेण्याचे वृत्तही खोटे असल्याचे बजरंग पूनियाने सांगितले.

 

ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप आहे

भारताच्या दिग्गज कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर ब्रिजभूषण यांच्याविरोधात दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे असतानाही जंतरमंतरवर कुस्तीपटूंचा संप सुरूच होता. यापूर्वी पोलिसांशी झालेल्या चकमकीनंतर त्यांना जंतरमंतरवरून हटवण्यात आले असले तरी बजरंग, विनेश, साक्षीसह अनेक कुस्तीपटूंचा विरोध सुरूच होता.

 

ब्रिजभूषण विरुद्ध 2 एफआयआर

लैंगिक शोषण आणि विनयभंगाच्या सुमारे 10 प्रकरणांमध्ये ब्रिजभूषण विरुद्ध 2 एफआयआरमध्ये तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. एफआयआरनुसार, ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंना अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचाही आरोप आहे.