भाषास्नी राणी… अहिराणी

भाषास्नी राणी... अहिराणी

शरद जाधव, टीव्ही 9 मराठी, मुंबई

आज जागतिक मातृभाषा दिवस. जगम्हान कुठला बी कोपरा मा जा..पण, आपली मायबोली कोणीच इसरत नही.. अशीच मन्ही मायबोली अहिराणी… भाषास्नी राणी.. मन्ही अहिराणी.. आमना खानदेशी लोकस्ले अहिराणीशिवाय जमत नहीच.. जी दुसऱ्या भाषांस्नी गत तीच आमना अहिराणी पण बरका.. अहिराणी भाषा बी दर 20-25 किलोमीटरवर बदलत जास..  जळगाव, धुळे, नंदुबार आणि नाशिकना कसमादे पट्टामझात अहिराणीनाच बोलबाला… अहिराणी बोलाबिगर जमावच नही..

अहिराणी बोलणारा मानूसच खरा खानदेशी समजास… आते मुंबईमा ऱ्हाईसनी बी  आमनासारखा अहिराणीचाच गोडवा गातस ना.. त्यानं कारण म्हंजे या अहिराणी भाषाना गोडवा..  गाळ्या बी गोड लागतीस एवढी गोड भाषा से मन्ही अहिराणी.. पण, म्हणून मी काय गाळ्या नही देत सुटाव बरका.. अहिराणी बोलाले सोपी वाटस खरी, पण ती लिव्हाले भयान अवघड बरका… त्यान कारण म्हणजे, या भाषानं बदलतं रूप.. तालुका-तालुकामझात अहिराणी भाषामा बदल होत जास…त्याना मझात बी आमना चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, पारोळा भागमाना अहिराणीना लहेजा एक, अन् अमळनेर, चोपडा, एरंडोल पट्टामझारची अहिराणीना दुसरा.. आते एकच जिल्हा मझात भाषा एवढी बदलस त मंग नंदुरबार, धुळे आणि नाशिकमझार अहिराणी कितली बदलत अशी ते  तुमले कयनं अशीच..

पण, भाषामा बदल होत ऱ्हायना तरी बी अहिराणी भाषा या समदा जिल्हास्ले जोडणारा समान धागा शे बरका.. म्हणीसनच, आमनी अहिराणी भाषा जगाले पायजे… जपाले पाहिजे… वाढाले पायजे.. त्यानासाठे अहिराणीना कवी, लेखक प्रयत्न करत ऱ्हातसचं.. अहिराणी कवीसंमेलन, साहित्य संमेलनबी व्हवाले लागनातस, हाई खरंच चांगलं शे.. जळगावना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठकडून बी या अहिराणी भाषाना संवर्धनसाठी प्रयत्न चालू करेल शेतस.. पण, या प्रयत्नस्मान अजून वाढ व्हवाले पाहिजे..

जुना म्हतारांसकडून धाकल्ला पोरसकडे हाई भाषा उनी.. पण, आते पुस्तकसमझारतून, इंटनेटवरुन आमनी अहिराणी शिकाडाले पाहिजे.. अहिराणीना गोडवा समदा जगमा जावाले पाहिजे.. समदास्ले तो गोडवा चाखता येवाले पाहिजे.. इतर बोली भाषांनासारखी मन्ही अहिराणीले बे मान-सन्मान भेटाले पायजे.. कारण  ‘हाई भाषास्नी राणी शे.. तुमनी आमनी आवडती अहिराणी शे’…