हनुमान चालीसा जवळ ठेवूनच ही हॉरर सीरिज बघा, प्रत्येक सीन पाहून अंग थर-थर कापते, आता OTT वर करतेय ट्रेंड
एक अशी सीरिज जे पाहताना देखील अंगावर येतो काटा. थर-थर कापायला लागते शरीर. सीन पाहून आठवते हनुमान चालीसा. आता OTT वर करतोय ट्रेंड.

थ्रिलर, हॉरर आणि रहस्यमय कथा पाहायला आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक भन्नाट वेब सीरिज सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. राजस्थानच्या वाळवंटी भागातील एका शापित गावाची कथा दाखवणारी ही सीरिज प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

अंधश्रद्धा, गूढ रहस्ये आणि भीतीदायक घटनांनी भरलेली ही कथा पाहताना अक्षरशः अंगावर काटा येतो. या वेब सीरिजचे नाव आहे दहन: राकन का रहस्य. ही सीरिज राजस्थानमधील काल्पनिक ‘शिलासपुरा’ गावाभोवती फिरते. वाळवंटाच्या मध्यभागी वसलेले हे गाव शापित असल्याचे मानले जाते.

गावातील लोकांच्या मते, एका प्राचीन मंदिराखाली ‘राकन’ नावाच्या भयानक राक्षसाला कैद करून ठेवण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून गावकरी त्या मंदिराजवळ जाणे टाळतात आणि त्या जागेबद्दल प्रचंड भीती बाळगून असतात.

कथेतील खरा ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा अवनि राउत ही आयएएस अधिकारी गावात खाणकाम प्रकल्पाला परवानगी देते. अवनि ही शिक्षित आणि विज्ञानवादी विचारांची अधिकारी असल्याने ती अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास ठेवत नाही. मात्र, खाणकामासाठी उत्खनन सुरू होताच गावात एकामागोमाग एक रहस्यमय घटना घडू लागतात. अचानक लोकांचे मृत्यू होऊ लागतात आणि गावात भीतीचे वातावरण निर्माण होते.

सीरिजमधील कलाकारांनीही दमदार अभिनय केला आहे. प्रत्येक पात्रामध्ये रहस्य आणि भीतीची भावना स्पष्ट जाणवते. विशेष म्हणजे या सीरिजची सिनेमॅटोग्राफी आणि बॅकग्राउंड म्युझिक कथा अधिक प्रभावी बनवतात. अनेक सीन इतके वास्तववादी वाटतात की प्रेक्षकांना पुढे काय होणार याची सतत उत्सुकता लागून राहते.

IMDb वर या सीरिजला 10 पैकी 7.1 इतकी चांगली रेटिंग मिळाली आहे. ही सीरिज तुम्ही Disney+ Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. थरार, रहस्य आणि अंधश्रद्धेच्या गोष्टी आवडणाऱ्यांसाठी ही सीरिज एक वेगळाच अनुभव देणारी ठरते.