
गेल्या काही दिवसांपासून मराठमोळी अभिनेत्री हेमलता बने पाटकर ही चांगलीच चर्चेत आहे. तिला पोलिसांनी तिला दीड कोटी रुपये लाच घेताना रंगेहात पडकले होते. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ माजली होती. 10 कोटी लाच प्रकरणातील पहिला हफ्ता घेताना हेमलता आणि तिच्या मैत्रिणीला अटक झाली. पण अनेकांना प्रश्न पडला होता की हे नेमकं प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया सविस्तर...

हे प्रकरण मूळचे एका मारहाणीच्या घटनेपासून सुरू झाले. गेल्या महिन्यात गोरेगाव परिसरातील एका लिफ्टमध्ये अमरिना झवेरी हिच्यासोबत गैरवर्तन आणि मारहाण झाल्याची तक्रार दाखल झाली होती. अमरिना गर्भवती असल्याने या मारहाणीत तिचा गर्भपात झाल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात व्यावसायिक अरविंद गोयल यांचा मुलगा रिदम गोयल याला अटक करण्यात आली होती. सत्र न्यायालयाने त्याला जामीन दिला, परंतू अमरिनाच्या हस्तक्षेप अर्जानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तो जामीन रद्द केला.

यानंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. अरविंद गोयल यांनी फिर्याद दाखल करत सांगितले की, त्यांच्या मुलाच्या जामिनाला विरोध न करण्याच्या बदल्यात हेमलता बाणे आणि अमरिना झवेरी यांनी १० कोटी रुपयांची खंडणी मागितली. तक्रारीनुसार, हेमलता हिने स्वतःला अमरिनाची नातेवाईक सांगत गोयल यांच्याशी संपर्क साधला आणि प्रकरण 'सेटल' करण्याची ऑफर दिली. साक्षीदार फिरतील व सर्वोच्च न्यायालयात जामिनाला विरोध केला जाणार नाही, असे आश्वासन देऊन मोठ्या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे.

दोघींना अटक केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. या दोघींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 308 आणि 61 अंतर्गत खंडणी मागणे व गुन्हेगारी कट रचण्याचे आरोप लावण्यात आले होते. पण 37 वे महानगर दंडाधिकारी विनोद पाटील यांनी हेमलता बाणे आणि अमरिना झवेरी यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन दिला.

हे प्रकरण समोर आल्यानंतर अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी स्पष्ट केले होते की, हेमलताचा त्यांच्या कुटुंबाशी गेल्या काही वर्षांपासून काहीही संबंध नाही. तसेच मुलाच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे.