निक्की तांबोळी-अरबाज पटेल यांच्या नात्यात दुरावा? सोशल मीडियावरील पोस्टने एकच खळबळ
‘बिग बॉस मराठी 5’मधून सोशल मीडियावर चर्चेत आलेली निक्की तांबोली आणि अरबाज पटेल यांची जोडी गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. अशातच आता त्यांनी एकमेकांना अनफॉलो केल्याची माहिती समोर आली आहे.

‘बिग बॉस मराठी 5’मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्या नात्याबाबत सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. शोदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली होती. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही चांगलीच पसंत पडली होती.

शो संपल्यानंतरही दोघांचं नातं कायम राहिलं आणि ते जवळपास दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात होतं.मात्र, आता निक्की आणि अरबाज यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

विशेष म्हणजे, दोघांनीही अद्याप आपल्या ब्रेकअपची अधिकृत घोषणा केलेली नाही किंवा याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, निक्की आणि अरबाज यांनी सोशल मीडियावर केलेल्या काही क्रिप्टिक पोस्टमुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.

निक्कीने अफेअर आणि नात्यातील दुर्लक्षाबाबत एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये नात्यातील व्यक्ती प्रयत्न करणं थांबवते आणि दिलेली आश्वासनं विसरते, तेव्हा बाहेरचं नातं निर्माण होऊ शकतं असा आशय व्यक्त करण्यात आला होता.

दुसरीकडे, अरबाजनेही बेवफाईचा उल्लेख करणारी एक स्टोरी शेअर केली. जोडीदाराची फसवणूक केल्यानंतर पुन्हा त्याच व्यक्तीकडे जाऊन तिच्या डोळ्यांत पाहत प्रेम व्यक्त करणं हा अनादराचा कळस असल्याचा आशय त्याच्या पोस्टमध्ये होता. त्यामुळे अरबाजचा हा इशारा नेमका कोणाकडे आहे, असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.