
पुण्याच्या भोरमध्ये दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी कबूतरप्रेमींकडून अनोखा खेळ खेळला जातो. या कबुतरांच्या खेळाला गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे

दिवाळीमध्ये सर्व कबुतर ढाबळ मालक एकत्रित वर्गणी गोळा करून, वेगवेगळ्या भागातून चांगली महागडी जातिवंत कबूतर खरेदी करून आणतात.त्यांना रंग देऊन गावकीच्यावतीने विविध ठिकाणाहून ही कबूतर आकाशात सोडली जातात.

त्यानंतर ढाबळ मालक आपल्या ढाबळीतील कबूतरांचा थवा आकाशात सोडतात आणि आकाशात सोडलेली कलरवाली जातिवंत कबूतर आपल्या कबुतरांच्या थव्यात घेण्यासाठी ढाबळ मालकांची स्पर्धा सुरू होते.

कलरवाली जातिवंत कबुतर आपल्या थव्यात घेणे म्हणजे प्रतिष्ठेच समजले जाते. यंदा पुण्यासह, हैदराबाद कर्नल येथून 350 जातिवंत कबूतर आणण्यात आली आहेत..

माजी आमदार सांग्राम थोपटे यांच्या हस्ते ही कबुतर सोडून या खेळाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर भोर नगरपालिका, राजवाडा, छत्रपती शिवतीर्थ चौपाटी, वाघजाई देवी मंदिर, भोर एसटी स्टँड, भोलावडे अशा विविध ठिकाणाहून ही कबुतर सोडण्यात आली..

जास्तीत जास्त जातिवंत कबुतर आपल्या थव्यात घेण्यासाठी परिसरातील ढाबळ मालक प्रयत्न करत असतात. कबूतरांना शिट्या मारत, ओरडत, काळ्या झेंड्याच्या मार्फत कबुतरांना मार्ग दाखवत या कबुतरांचा थवा आकाशात अगदी कल्पकतेने उडवून हा खेळ खेळाला जातो.

त्यानंतर ही कबुतरं आपल्या थव्यात घेण्यासाठी ढाबळ मालकांची चुरस रंगली आहे. मोठ्या उत्साहात ठिकठिकाणचे कबूतर प्रेमी हा खेळ खेळत आहे. टीव्ही ९ मराठीचे प्रतिनिधी विनय जगताप यांनी याचा आढावा घेतला आहे.

भाऊबीज दिवशी हा अनोखा खेळ खेळत कबुतर प्रेमी दिवाळी सणाचा आनंद लुटतात. भाऊबीज पासून पुढे दोन ते तीन दिवस हा खेळ खेळाला जातो.