
'जीव माझा गुंतला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या घटस्फोटाचं वृत्त ताजं असतानाच आता मराठी टीव्ही इंडस्ट्रीतल्या आणखी एका जोडप्याच्या विभक्त होण्याची चर्चा होत आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेत झळकलेली अभिनेत्री अक्षया गुरव आणि तिचा पती भूषण वाणी घटस्फोट घेत असल्याचं कळतंय. या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी लग्नाचे फोटोसुद्धा डिलिट केले आहेत.

अक्षय आणि भूषण यांनी 23 मे 2017 रोजी लग्नगाठ बांधली होती. आता लग्नाच्या आठ वर्षांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं कळतंय. यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. योगिता आणि सौरभप्रमाणेच अक्षय आणि भूषणनेही या चर्चांवर अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

एका मित्राच्या घरी अक्षया आणि भूषण यांची एकमेकांशी पहिल्यांचा भेट झाली होती. हे दोघं एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करतात. भूषणचा स्वभाव आणि माझ्या कामाला पाठिंबा देणं, या गोष्टी भावल्याचं अक्षयाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

अक्षयाने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तर भूषणने रिलायन्स जिओ, सॅव्हलॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या ब्रँड्सच्या जाहिरातींचा डिओपी म्हणून काम केलंय.