
बॉलिवूड इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत, ज्यांचा एखाद-दुसरा चित्रपट तुफान हिट ठरला. यामुळे त्यांना पैसा, प्रसिद्धी सर्वकाही मिळालं. मात्र त्यानंतर त्यांच्या करिअरचा आलेख खाली घसरत गेला. असाच एक अभिनेता म्हणजे आमिर खानचा भाचा इमरान खान.

इमरान खानने 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये जिनिलिया डिसूझासोबत त्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटामुळे इमरान रातोरात स्टार बनला होता.

यानंतर त्याने 'दिल्ली बेल्ली', 'मेरे ब्रदर की दुल्हन', 'आय हेट लव्ह स्टोरी', 'कट्टी बट्टी', 'गोरी तेरे प्यार में', 'ब्रेक के बाद' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मात्र त्याला विशेष यश मिळालं नाही. 'वोग इंडिया' या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत इमरानने त्याच्या कठीण काळाचा उल्लेख केला होता.

इमरानने सांगितलं की त्याला त्याची महागडी फरारी कार विकावी लागली होती. आर्थिक तंगीमुळे त्याने पाली हिल इथला बंगलासुद्धा विकला होता. बंगला विकून इमरान एका छोट्या फ्लॅटमध्ये राहू लागला आहे.

सध्या इमरान अत्यंत साधं आयुष्य जगतोय. माझ्या किचनमध्ये फक्त तीन प्लेट, तीन चमचे, दोन कॉफी मग आणि एक फ्राइंग पॅन आहे, असं त्याने सांगितलं. 2016 पासून स्वत:चे केस स्वत:च कापत असल्याचं त्याने म्हटलंय.