
तामिळनाडूचे अभिनेता आणि राजकारणात सक्रीय झालेल्या विजय थलपती यांच्या करूर येथील रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल 20 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर आता तामिळनाडूमध्ये राजकीय पडसाद उमटत आहेत.

या रॅलीमध्ये सहभागी झालेले अनेक लोक चेंगराचेंगरीत बेशुद्ध झाल्याचेही समोर आले आहे. काही लोक जखमी झाले असून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. दरम्यान, आता ही घटना नेमकी कशी घडली, ते समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विजय थलपतीची करूर येथे एक मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला लाखो लोक जमा झाले होते. प्रमाणापेक्षा जास्त लोक जमा झाल्याने या गर्दी अनियंत्रित झाली. त्यानंतर अचानकपणे चेंगराचेंगरी सुरू झाली.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. विजय थलपती या सभेला संबोधित करत होते. मात्र अचानक लोकांमध्ये चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. यात विजय थलपतीच्या पक्षाचे काही कार्यकर्ते तसेच इतर लोक बेशुद्ध झाले. ही बाब विजय थलपतीच्याही लगेच लक्षात आली.

त्याने चालू झालेल्या चेंगराचेंगरीनंतर लगेच भाषण थांबवले आणि कारवर चढून लोकांना पाणी बॉटल वाटण्यास सुरुवात केली. त्यानंतर लगेच रुग्णवाहिका आल्या आणि जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान चेंगराचेंगरीची ही घटना घडल्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी तामिळनाडूचे आरोग्यमंत्री तसेच तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी जखमींची तातडीने मदत करण्याचा आदेश दिला आहे.