
घारे डोळे असलेल्यांची अनेकदा खिल्ली उडवली जाते किंवा ते खूप चलाख असतात, अशीही टीका केली जाते. अनेक सेलिब्रिटींनाही असा अनुभव आला आहे. मराठमोळी अभिनेत्री अदिती गोवित्रीकरने नुकताच याबद्दलचा तिचा अनुभव सांगितला आहे.

अदिती गोवित्रीकरने सांगितलं की तिला तिच्या डोळ्यांमुळे कॉलेजमध्ये बऱ्याच थट्टामस्करीला सामोरं जावं लागलं होतं. इतकंच नव्हे तर कॉलेजमध्ये नजर वर करून कधी चालू शकली नव्हती, असा खुलासा तिने केला. तेव्हा अदिती नुकतीच मुंबईला आली होती.

घारे डोळ्यांबद्दल न्यूनगंड बाळगल्याने अदिती बराच काळापर्यंत तणावाची शिकार झाली. तिला तिच्या दिसण्याबद्दल आत्मविश्वासच जाणवत नव्हता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.

'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत अदिती म्हणाली, "मला माझीच लाज वाटत होती. लहानपणी मी ईव्ह-टीझिंगची (इतकांची खिल्ली उडवणं) बरीच शिकार झाले होते. मी कॉलेजमध्ये चालत असली तरी मुलं 'म्याऊं' म्हणून चिडवायचे. कारण माझ्या डोळ्यांना कॅट-आइज म्हणजे मांजरीसारखे डोळे असल्याचं म्हटलं जायचं."

"खिल्ली उडवण्याच्या भीतीने मी नजर वर करून बघायचेसुद्धा नाही. मी माझ्या कुटुंबीयांसोबत कुठे गेली तरी हेच व्हायचं. त्यामुळे मी लोकांपासून दूरच राहायची. त्यावेळी मी खूप बारिकसुद्धा होते. त्यामुळे आई सतत म्हणायची की, वजन वाढव, तुझ्याशी लग्न कोण करणार", असं तिने पुढे सांगितलं.