
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी पार्थ आणि जय पवार या दोघा पुत्रांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी सकाळी बारामतीत येत असताना विमान कोसळून झालेल्या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला.

अजित पवार यांच्या निधनाने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान मैदानात अजितदादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजित पवार यांना अखेरचा निरोप देताना पक्षाच्या नेत्यांना अश्रू अनावर झाले, तर राज्यभरातील कार्यकर्त्यांनी शोकमग्न अवस्थेत त्यांना अंतिम निरोप दिला.

अजित दादा परत या.. असं म्हणत कार्यकर्त्यांनी टाहो फोडला. साश्रू नयनांनी अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या अंत्यदर्शनाला अफाट जनसागर लोटला होता.

यावेळी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशभरातील राजकीय पक्षांचे नेते या प्रसंगी उपस्थित राहिले. बारामती तालुक्यातील निरावागज, पणदरे, करंजेपूल (सोमेश्वर) आणि सुपा या गावात बुधवारी सकाळी अजितदादांच्या प्रचारसभांचं आयोजन करण्यात आलं होतं.

त्यासाठी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी अजित पवार यांच्या विमानाने मुंबईहून उड्डाण केलं. मात्र सकाळी पावणेनऊच्या सुमारास हे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी आधीच कोसळलं आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं.

अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने देशभर खळबळ उडाली. प्रशासनावर पकड असलेला, जनतेच्या प्रश्नांवर सदैव काम करत राहणारा आणि रोखठोक व्यक्तिमत्त्व असलेला नेता गमावल्याची भावना देशभरातून व्यक्त होत आहे.

अजित पवार यांच्या अकाली निधनाच्या धक्क्याने सारेच हादरले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह देशभरातील नेतेमंडळींनी अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

अजित पवार यांचं पार्थिव ठेवण्यात आलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यदर्शनासाठी बुधवारी रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी गर्दी केली होती. गुरुवारी अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर पार्थ आणि जय पवार यांनी हात जोडून जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.