
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कनिष्ठ सुपुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाहसोहळा येत्या ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत बहरीन येथे पार पडणार आहे. सध्या या शाही विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. या सोहळ्याला संपूर्ण पवार कुटुंब अनुपस्थित राहणार असल्याची चर्चा रंगली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक प्रमुख सदस्य या लग्नासाठी बहरीनला उपस्थित राहणार नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे जय पवार यांच्या लग्नासाठी बहरीनला जाणार नाहीत. त्यांच्या पत्नीही प्रतिभा पवारही या लग्नसोहळ्याला अनुपस्थित असतील.

शरद पवार गटाच्या खासदार आणि जय पवारांची आत्या सुप्रिया सुळे या देखील विवाहसोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. त्यासोबतच अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार हे त्यांच्या पत्नीसह बंगळुरू येथील एका विवाहसोहळ्याला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे ते बहरीनच्या कार्यक्रमात गैरहजर राहतील.

राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी या लग्नसोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र तरीही ते अनुपस्थितीत असतील. या प्रमुख सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे पवार कुटुंबातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या शाही विवाहसोहळ्यासाठी ४०० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यात पवार कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती गैरहजर राहणार असले तरी युवा पिढीतील काही सदस्य लग्नाला उपस्थिती दर्शवणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आणि शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार हे जय पवारांच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत. युगेंद्र पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी तनिष्का कुलकर्णी देखील या लग्नासाठी उपस्थित असतील.

युगेंद्र पवार आणि तनिष्का हे दोघेही लग्नासाठी बहरीनला जाणार आहेत. त्यासोबतच सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळेही लग्नाला हजर असणार आहे. विशेष म्हणजे, खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे लग्नाला अनुपस्थित राहणार असले तरी, त्यांच्या कुटुंबातील सदस्य या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.

जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा शाही विवाहसोहळा ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत बहरीन येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आज ४ डिसेंबरला मेहंदी समारंभाने होईल.

त्यानंतर, ५ डिसेंबर या दिवशी हळदी, वरात आणि लग्नसोहळा पार पडेल. यानंतर ६ डिसेंबर रोजी पाहुण्यांसाठी बीच ऑलिम्पिक्सचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर ७ डिसेंबर रोजी स्वागत समारंभाने या चार दिवसीय शाही विवाहसोहळ्याची सांगता होईल.